वाहनांच्या दिव्यांत बदलामुळे अपघाताचा धोका

वाहनांच्या दिव्यांत बदलामुळे अपघाताचा धोका

Published on

पिंपरी, ता. १७ ः वाहनांच्या दिव्यांमध्ये मालक व चालकांकडून मनमानी पद्धतीने बदल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे अपघात होत आहेत. विशेषतः जादा प्रकाशाच्या एलईडी लाइट बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे क्षणभरासाठी दृष्टीवर परिणाम होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.
वाहनांना कंपनीद्वारे दिलेले दिवेच वापरणे बंधनकारक असताना, अनेकजण प्रकाश वाढतो किंवा वाहनाचा ‘लुक’ चांगला दिसतो, यामुळे दिव्यांमध्ये हवे तसे बदल करतात. मात्र, अशी प्रखर प्रकाशाची दिवे लावलेले वाहने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

वाहनांच्या दिव्यांशी संबंधित नियम
- प्रत्येक वाहनाला प्रमाणित प्रकाश दिवे असणे अनिवार्य
- रात्री समोरच्या बाजूला लो-बीम प्रकाश दिव्यांचा वापर अनिवार्य
- समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर प्रकाश पडून अपघाताची शक्यता
- वाहनांवर इतर कोणतेही फॅन्सी किंवा अतिरिक्त दिवे बसवणे बेकायदा

उदाहरण
- भोसरीहून तळवडेकडे मोटारीने जाताना समोरून एक वाहन आले. त्या वाहनाच्या दिव्यांचा प्रकाश अतिशय प्रखर होता. तो डोळ्यांवर पडल्याने मोटारचालकाच्या डोळ्यांवर अंधारल्यासारखे झाले. दरम्यान, समोरचे काहीच दिसेनासे झाल्याने मोटार चालकाने त्याची मोटार थोडावेळ रस्त्याच्या बाजूला थांबवली. वेळीच मोटार रस्त्याच्या बाजूला घेतल्याने धोका टळला.
- रात्रीच्या वेळी मोशी प्राधिकरणातील एक लघुउद्योजक दुचाकीवरून पुनावळेकडून रावेतकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या मोटारीच्या प्रखर प्रकाशामुळे दुचाकी चालकाला समोरचे दिसेनासे झाले. यामुळे अपघात होऊन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

‘‘वाहन उत्पादक कंपन्यांनी बसवलेले प्रकाश दिवेच वापरणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त मोठ्या प्रकाशाचे दिवे बसविलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. यासाठी वाहनांची वेळोवेळी तपासणी केली जात असते. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

‘‘वाहनांच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश म्हणजे रस्त्यावरचा अदृश्य धोका आहे. नियमबाह्य दिव्यांचा वाढता वापर केवळ शिस्तभंग नसून गंभीर धोका आहे. यासाठी वाहनचालकांनी कंपनीमान्य दिवेच वापरणे आवश्यक आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी.
- रवींद्र खेडकर, वाहनचालक

‘‘वाहनांच्या मूळ दिव्यांमध्ये बदल करून बेकायदारित्या प्रखर प्रकाशाचे दिवे बसविणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नियमबाह्य दिवे वापरणाऱ्या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात असते.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com