निवडणूक तक्रार निवारणासाठी यंत्रणा सक्षम करा ः हर्डीकर
पिंपरी, ता. १७ ः महापालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. महापालिका निवडणुकीसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा हर्डीकर यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील दैनंदिन सेवा, स्वच्छता व्यवस्था, खड्डेमुक्ती मोहीम आणि मास्टर प्लॅन अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आयुक्तांनी मागवली. अवैध होर्डिंग हटविण्याची मोहीम, रस्ते प्रकाशयोजना, जलपुरवठा व ड्रेनेज यंत्रणेची स्थितीबाबतही चर्चा करून अधिकाऱ्यांना कार्यवाहीची सूचना केली.
---

