‘सक्षमा’तील महिलांच्या वस्तूंना जागतिक परिषदेत उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. १७ ः महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्यातर्फे महिला सक्षमीकरणासाठी ‘सक्षमा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फॅसिलिटेशनतर्फे (आयएएफ) लवळे येथील सांदिपणी होमेटेल येथे आयोजित परिषदेत महिला बचत गटांद्वारे तयार केलेल्या घरगुती हस्तनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री दालन उभारले होते. त्यातून वारली नोटबुक, फाईल, पेन स्टँड, कँडल, सरस्वती फ्रेम्स, फ्रीज मॅग्नेट, कॉटन पाऊच आणि इंडियन गांधी खण टोपी अशा विविध वस्तू खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण २८ हजारांची विक्री झाली. उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींना ‘सक्षमा’तील महिलांनी तयार केलेल्या ७५ सरस्वती फ्रेम्स भेट दिल्या. दुबईतून आलेले गुरविंदर सिंह यांनी वारली कॉम्बो डायरीची विशेष मागणी नोंदवली, अशी माहिती महापालिका उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली.
---

