अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’

अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’

Published on

पिंपरी, ता. १८ ः बेदरकार अवजड वाहनांची वाहतूक व रस्त्यावरील खड्डे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. मध्यवर्ती भागासोबतच उपनगरांमध्येही अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतेच पुनावळे व मोशी येथे झालेल्या अपघातांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे रस्त्याची संथगतीने चालू असणारी कामे व अवजड वाहनांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाची उदासिनता यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच खराब रस्ते, रखडलेली रस्त्याची कामे, ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, बेदरकारपणे धावणारे डंपर, मिक्सर व ट्रक आणि बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे या विकसित होणाऱ्या भागामध्ये मोठ मोठ्या हाउसिंग सोसायटी उभ्या राहत आहेत. त्यामुळे या भागात अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात सर्वाधिक अपघातांच्या घटना याच भागात झालेल्या आहेत. रस्ते दुरुस्ती करण्याबाबत असलेली प्रशासनाची उदासीनता व अवजड वाहनांवर नसलेले नियंत्रण यामुळे सातत्याने अपघात घडत असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला आहे.

खराब रस्तेही कारणीभूत
या अपघातांना केवळ अवजड वाहनांचा अति वेगच नव्हे, तर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था देखील कारणीभूत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. बांधकामांचे साहित्य वाहणाऱ्या अवजड वाहनांतून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणि राडारोडा यामुळे दुचाकीस्वार वारंवार घसरून अपघात होत आहेत. ही परिस्थिती सोमवारी (ता. १७) अपघात झालेल्या पुनावळे भागातच नाही तर जिथे जिथे अपघात झाले त्या भागातही दिसून येत आहे.

बंदीच्या काळातही वाहतूक सुरू
​वाहतूक पोलिसांनी सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना नागरी वस्तीत प्रवेश बंदीचे आदेश दिले आहे. गेल्या महिन्यात माण येथे झालेल्या अपघातानंतर बंदीचे तासही वाढवले आहेत. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अवजड वाहनांचे वेगावर नियंत्रण नसणे, वाहतुकीचे नियम न पाळणे यामुळे दुचाकी घेऊन घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले असल्याचे पुनावळेतील नागरिकांनी सांगितले

अवजड वाहनांमुळे यावर्षी झालेले अपघात
२४ जानेवारी ः माण येथे मिक्सर पलटी झाल्याने त्याखाली चिरडून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू
२ जुलै ः ताथवडे येथे डंपरने दुचाकीला मागून धडक दिल्याने ३७ वर्षीय महिला गंभीर जखमी
२९ जुलै ः पुनावळेतील काटे वस्ती येथे डंपरखाली आल्याने ३३ वर्षीय महिला दुचाकीस्वाराचा मृत्यू
१२ ऑगस्ट ः हिंजवडी फेज - २ येथे ११ वर्षीय मुलीचा डंपरखाली चिरडून मृत्यू
१० ऑक्टोबर ः हिंजवडी-माण रस्त्यावर पांडवनगर चौकात सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू

अवजड वाहनांचा अतिवेग जसा या अपघातांना कारणीभूत आहे. तसेच परिसरातील खराब रस्तेही अपघातांना कारणीभूत आहेत. खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवणे कठीण झाले आहे. त्यातच अवजड वाहतुकीची यामध्ये भर पडली आहे. पोलिसांनी जरी वर्दळीच्या वेळी या वाहनांवर बंदी घातली असली तरी हे नियम वाहन चालक-मालक यांच्याकडून पाळले जात नाहीत.
- शैलेश गभणे, रहिवासी, पुनावळे

जड वाहतूक ही दिवसा बंदच असली पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनच मागणी आहे. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदनही दिले होते. मात्र, पुढेही काहीच झाले नाही. दुपारी शाळा सुटण्याची वेळ असते. त्यामुळे दुपारीही या गाड्यांना बंदी असणे गरजेचे आहे. सध्या पोलिसांनी केलेली बंदी कागदावरच आहे.
-सुमीत ढगे, रहिवासी, पुनावळे

गेल्या महिन्यात माण येथे झालेल्या अपघातानंतर आम्ही अवजड वाहनांसाठी निर्बंध वाढवले आहेत. सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ५ ते ९ या वेळात अवजड वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ज्या भागात काम सुरू आहे. त्या भागात वेगमर्यादाही निश्‍चित करण्यात आली आहे.
-विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com