सदाबहार किशोरदांची बहारदार गाणी

सदाबहार किशोरदांची बहारदार गाणी

Published on

पिंपरी, ता. ८ ः किशोर कुमार यांच्या ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’, ‘मेरे नैना सावन भादो, अशा अनेकविध अजरामर गीतांचे सादरीकरण...त्याला मिळणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’ची दाद, गायक जितेंद्र भुरुक यांची अप्रतिम गायकी, आरजे बंड्या यांनी केलेले खुमासदार निवेदन, किशोरदा यांचे किस्से अशा मेजवानीसह सकाळ प्रस्तुत ‘सोलफुल किशोर’ हा कार्यक्रम जल्लोषात झाला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील किशोरप्रेमींनी हाउसफुल्ल प्रतिसाद दिला. संगीतप्रेमींचे दैवत असणाऱ्या किशोर कुमार यांचा ९६ वा जन्मदिवस चार ऑगस्टला झाला. या निमित्त या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.
गायक जितेंद्र भुरुक यांनी ‘हमें और जिने की चाहत ना होती’ या गाण्याने मैफलीची सुरवात केली. त्यांनी गायलेल्या मेरे मेहबूब कयामत होगी या गाण्याला रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली. ‘फिर होगा क्या पता क्या खबर’, ‘इक अजनबी हसीना सें’, ‘तुम क्या जानो मोहब्बत क्या है’ , ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘जिंदगी इक सफर है सुहाना’, ‘नखरे वाली’, ‘जलता है जिया मेरा भिगी भिगी रातों मे’ अशा प्रत्येक गाण्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर त्यांनी गायिका राजेश्वरी पवार यांच्यासोबत त्यांनी ‘देखा इक ख्वाब’ ,‘ इंतहा हो गई इंतजार की’ या हिंदी गाण्यांसोबत ‘अश्‍विनी ये ना..’ हे मराठी गाणे गायले. खास राखीपौर्णिमेनिमित्त भुरुक यांनी गायलेले ‘फुलों का तारों का सबका कहना है’ , तसेच बासरीच्या सोबतीने ‘हवा के साथ साथ’ या गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण केले.
मध्यंतरानंतर जितेंद्र भुरुक ‘ मुसाफिर हुं यारो’ या गाण्याने सुरवात केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीमध्ये रसिकांनी आपल्या गाण्यांच्या फर्माईशही मांडल्या. त्यानंतर त्यांनी गायलेल्या ‘मिल गया हमको साथी मिल गया’ या गाण्याला सहकलाकारांनी उत्तम साथ दिली. ‘ ये जवानी है दिवानी’ या गाण्याला दिलेली विविध तालवाद्यांच्या जुगलबंदीची जोड प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. ‘कभी अलविदा ना कहना’ या गाण्याने त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com