अधिकारी बनण्याच्या स्वप्नांना पंख
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुंबईतील राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या सावित्रीबाई फुले अकादमीने अधिकारी होण्याच्या तरुणांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत. या अकादमीच्या रूपाने लाभलेल्या माध्यमातून संधीचे सोने करण्यासाठी मेहनत घेतलेल्या १२९ विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.
या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेला सामोरे जाऊन उल्लेखनीय प्रगती साधली आहे. अनेक जण पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. काहीजण मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीस पात्र ठरले आहेत. याशिवाय इतर काही विद्यार्थ्यांची इतर राज्यस्तरीय व केंद्रीय स्पर्धा परीक्षांमधून निवड झाली आहे. वाकडमध्ये २०२३ मध्ये ही अकादमी सुरू झाली.
----
घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मी बारावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण करू शकलो. विखे फाउंडेशनच्या माध्यमातून मी अभियांत्रिकीची पदवी घेतली. तेव्हा पुस्तके घेण्यासाठी पैसे नसायचे, मात्र जिद्द कायम होती. लष्करात इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून माझी निवड झाली. अधिकारी होण्याचे व गरीब विद्यार्थ्यांसाठी झटायचा मला ध्यास होता. त्यामुळे मी नोकरी सोडून श्रीगोंद्यातील बाबा आमटे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागलो. समाजसेवकांच्या मदतीने गरजूंसाठी अभ्यासिकाही सुरू केली. त्याचवेळी वर्ग एकचा अधिकारी होण्याचे स्वप्न साकारण्याच्या जिद्दीने अभ्यासही सुरू होता. नंतर मला या अकादमीत प्रवेश मिळाला. मी मेहनत सुरू ठेवली. युपीएससी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन मी सध्या बारामती तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहे, तसेच मुख्य परीक्षेचीही तयारी सुरू आहे. या अकादमीतील विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करीत असतो.
- शिवप्रसाद जाधव
------
सातारा जिल्ह्यातील अंगापूरमध्ये मी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर पुण्यातील सीओईपी महाविद्यालयातून मी प्रॉडक्शन अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नोकरी केली नाही. काही दिवस मी ज्ञानप्रबोधिनीत अभ्यास केला. या अकादमीची माहिती मिळाली. त्यानंतर प्रवेश परिक्षेतून मी पात्र ठरलो. शांत वातावरण आणि आवश्यक पुस्तकांमुळे चांगला अभ्यास झाला. मी पहिल्या प्रयत्नातच युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मेन्स आणि मुलाखत देऊन वर्ग एकचा अधिकारी झालो. सध्या मी भोपाळमध्ये कार्यरत आहे.
- गिरीश कनसे, सहाय्यक प्रबंधक, नाबार्ड
-------
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
- सामाईक परीक्षा
- गुणवत्तेनुसार निवड
- पसंतीनुसार प्रवेश
- उर्वरित जागांसाठी जाहीर प्रकटन
- त्यानंतरही प्रतिसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी पुरावा असलेल्यांना प्राधान्य
----
अकादमीची वैशिष्ट्ये
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण
- विनामूल्य निवासी प्रशिक्षण
- पुस्तकांचे अद्ययावत ग्रंथालय
- वातानुकूलित अभ्यासिका
- व्याख्यान कक्ष
- रात्री अभ्यास करण्याची व्यवस्था
- प्रवेश क्षमता ः ५०
- प्रशिक्षण सत्र
- तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- ११ महिन्यांसाठी प्रवेश
- दरमहा चार हजार रुपये विद्यावेतन
--------
अकादमीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पुस्तके, निवासी सुविधा आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे विद्यार्ती अधिकाधिक वेळ अभ्यास करू शकतात. त्यांना कोणत्याही बाबतीत कमतरता भासत नाही. दरवर्षी अनेक विद्यार्थी युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेची तयारी करतात. आजवर अनेक विद्यार्थी युपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांत यशस्वी झाले आहेत.
- रंगनाथ नाईकडे, संचालक, सावित्रीबाई फुले अकादमी, वाकड
-------
फोटो आयटी
40807