नव्‍या स्‍वस्‍त धान्‍य दुकानांना 
सप्‍टेंबरमध्ये मिळणार मंजुरी

नव्‍या स्‍वस्‍त धान्‍य दुकानांना सप्‍टेंबरमध्ये मिळणार मंजुरी

Published on

पिंपरी, ता. १३ : पिंपरी आणि चिंचवड कार्यालयांतर्गत स्‍वस्‍त धान्‍य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्‍यानुसार सात दुकानांसाठी २८ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. सप्‍टेंबर महिन्‍यात जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्‍यामध्ये या दुकानांना मंजुरी मिळणार आहे.
वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांच्या आत असणाऱ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामध्ये एका शिधापत्रिकेवर १० किलो गहू दोन रुपये दराने; तर १५ किलो तांदूळ तीन रुपये दराने प्राप्त होतो. वार्षिक ५९ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होतो. त्यामधील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील समाविष्ट प्रत्येक व्यक्तीमागे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळतो. तर ५९ हजार रुपयांच्यावर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप बंद झाले आहे. स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांमार्फत धान्‍य वाटप करण्यात येत आहे.
शहरात सध्या तीन लाख ३८ हजार ६४० शिधापत्रिकाधारकांमागे केवळ २५३ दुकानदार आहेत. नव्याने केलेल्या अर्जामध्ये अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ती प्रक्रिया प्रलंबित आहे. सध्या पिंपरी आणि चिंचवड कार्यालयांतर्गत सात जागांसाठी २८ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यांची पडताळणी होणार आहे. त्‍यानंतर पंचनामे करून अधिकाऱ्यांकडून स्‍थळ पाहणी होणार आहे. सप्‍टेंबर महिन्‍यातील पहिल्‍या आठवड्यात रास्‍त भाव दुकान मंजूर समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्‍या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्‍यानंतर दुकानांना मंजुरी मिळणार आहे.


नव्‍याने अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यांचे पंचनामे, स्‍थळ पाहणी होणार आहे. जिल्‍हाधिकारी हे रास्‍त भाव दुकान मंजुरी समितीचे अध्यक्ष असतात. त्‍यांच्‍यामार्फत पुढील परवानगीची प्रक्रिया केली जाणार आहे. सप्‍टेंबरमध्ये त्‍याची बैठक होणार आहे.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड

Marathi News Esakal
www.esakal.com