कार्यालयीन पद्धतीत दिवाळीत बदल नको
पिंपरी, ता. १५ ः महावितरणने विभागाची (सेक्शन) पारंपरिक कार्यालयीन पद्धत बंद करून नव्या फेररचनेचा (रीस्ट्रक्चरिंग) अवलंब दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात करू नये. याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरनंतरच करावी, अशी मागणी पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) सचिन तालेवार आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नव्या पद्धतीची अंमलबजावणी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात करणे ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अव्यवहार्य ठरेल. महावितरण कंपनीने राज्यभरात गेल्या ६५ वर्षांहून जास्त काळ ‘सेक्शन’ पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रशासनात कार्यक्षमता व आधुनिकता आणणे हे नव्या पद्धतीचे उद्देश आहेत, मात्र या प्रक्रियेबद्दल ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप आवश्यक जनजागृती झालेली नाही. त्यातच दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अचानक अशी रचना बदलल्यास कामकाजात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तालेवार आणि पवार यांनी या निवेदनाची त्वरीत दखल घेतली आहे. महावितरणच्या ग्राहकांना कोणतीही समस्या भेडसावू नये, यासाठी सज्ज राहण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
-----