‘ग्रेड सेपरेटर’मध्ये कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी
पिंपरी, ता. १५ : पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमधील (समतल विलगक) भुयारी मार्गात बुधवारी (ता. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. चिंचवड रेल्वे स्थानकापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परिणामी कामावर जाणारे नागरिक आणि विद्यार्थी सुमारे तीन तास कोंडीत अडकले होते. या घटनेमुळे पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निगडी ते दापोडीदरम्यान ११ किलोमीटरचे तीन ग्रेड सेपरेटर, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाणपूल बांधण्यात आले. ग्रेड सेपरेटरमधून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. नाशिक, भोसरी एमआयडीसीला जाणारी अवजड वाहनेही याच मार्गावरून जातात. बुधवारी सकाळी पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकातील भुयारी मार्गात अडकला. कंटेनर अडकल्याने भुयारी मार्गाची एक बाजू पूर्णपणे ब्लॉक झाली. परिणामी, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली. वाहनाच्या चिंचवडपर्यंत रांगा लागल्या. ग्रेड सेपरेटर ब्लॉक असल्याने काहींनी बीआरटी आणि सर्व्हिस रस्त्यावरून वाहने नेण्याचा प्रयत्न केला. पण, सर्व वाहने सर्व्हिस रस्त्यावर आल्याने तिथेही कोंडी झाली होती. परिणामी सकाळी ऑफिसला जाणारे कर्मचारी आणि शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी या कोंडीत अडकले. सकाळी साडेदहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी अडकलेला कंटेनर काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पण, तोपर्यंत वाहनचालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा!
ग्रेड सेपरेटरमधील भुयारी मार्गातून जाणाऱ्या वाहनांसाठी साडेचार मीटर उंची निश्चित करण्यात आली आहे. या उंचीपेक्षा अधिक उंचीचे वाहने भुयारी मार्गातून जाऊ नयेत म्हणून भुयारी मार्गात प्रवेश करण्यापूर्वी काही अंतरावर साडेचार मीटर उंचीचा उंचीरोधक (हाइट बॅरिअर) उभे केले आहे. पण, ग्रेड सेपरेटरमध्ये खड्डे पडल्याने रस्ता डांबरीकरण केले. डांबरीकरण करताना जुना डांबर न काढता त्यावरच डांबरीकरण केले. परिणामी, भुयारी मार्गाची उंची ४.५ मीटरपेक्षा कमी झाली अन् उंचीरोधकची उंची ४.५ मीटर राहिली. परिणामी, कंटेनर उंचीरोधकमधून पुढे गेला आणि भुयारी मार्गात अडकला. त्यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
‘‘भुयारी मार्गापेक्षा उंचीरोधक (हाइट बॅरिअर)ची उंची जास्त ठेवली आहे. त्यामुळे पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
- अनिकेत दळवी, वाहनचालक
‘‘वाहने भुयारी मार्गात अडकू नयेत म्हणून उंचीरोधक (हाइट बॅरिअर) बसवले आहे. पण, तरीही वाहने अडकत असतील तर भुयारी मार्गाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.