प्लॅस्टिकचा वापर टाळा, 
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा

प्लॅस्टिकचा वापर टाळा, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा

Published on

पिंपरी, ता. १९ : दिवाळी सणाच्या उत्साहात बाजारपेठा, घरांची सजावट आणि भेटवस्तूंची खरेदी यांना वेग आला आहे. मात्र, या आनंदात प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारा पर्यावरणीय आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, फुगे, सजावटीच्या वस्तू आणि गिफ्ट रॅप्स यांचा वापर वाढतो. या सर्व वस्तू वापरल्यानंतर कचऱ्यात जातात व पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतात. अशा वस्तू विघटन न होणाऱ्या असल्याने नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, प्रदूषण वाढते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरणपूरक दिवाळी, स्वच्छ शहराची दिवाळी हा संदेश देत विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे. याशिवाय, प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपासणी पथकेही तयार करण्यात आली आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना अथवा विक्री करताना निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

‘‘घरातील स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाची स्वच्छता राखणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पर्यायांचा वापर करून सण साजरा करावा. प्लॅस्टिकमुक्त दिवाळी ही फक्त मोहीम नसून प्रत्येक नागरिकांनीदेखील हा संकल्प करायला हवा.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
---

Marathi News Esakal
www.esakal.com