‘अभंग रिपोस्ट’मधून उमटले ‘आनंद तरंग’

‘अभंग रिपोस्ट’मधून उमटले ‘आनंद तरंग’

Published on

पिंपरी, ता. २० : पंढरपुरीची वारी पूर्ण केल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसताच वारकऱ्यांच्या मनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग।।’ असा भाव उमटतो. असेच भक्तिमय आणि भावपूर्ण आणि तितकेच उत्साही वातावरण रविवारी (ता. १९) सायंकाळी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पाहायला मिळाले. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमाचे.

वारकरी संप्रदायात अभंगाला टाळ चिपळ्यांची जोड असते आणि पखवाजाची साथ असते. ‘विठ्ठलऽ विठ्ठलऽऽ’ असो की ‘तुकारामऽ तुकारामऽऽ’ नामस्मरण. अभंगात दंग होऊन ‘पावली’, ‘फुगडी’ खेळली जाते. या सर्वांची अनुभूती ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमातून रविवारी आली. संतांच्या अभंगांना नव्या ढंगात, नव्या वाद्यांच्या साथीने सादर करण्याचा प्रयत्न यातून झाला. पारंपरिक भक्तिगीते गिटार, ड्रम्स आणि की-बोर्डच्या तालावर सादर केले. ‘आनंदाचे डोही’ भक्तिगीतांचा ‘खेळ मांडियेला’ म्हणत आधुनिक संगीताच्या शैलीतील सूर-तालांचा अनोखा मिलाफ साधला. परंपरा आणि आधुनिकतेचा सेतूच जणू बांधला. हे सर्व तरुण कलाकारांचे जोशपूर्ण सादरीकरण होते. त्यांना भारावून गेलेले आणि भक्तीत दंग झालेल्या प्रेक्षकांची अभंग गात अनोखी आणि उत्स्फूर्त दाद मिळाली. या कार्यक्रमाने सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘चल गं सखे पंढरीला’, ‘लहानपण दे गा देवा’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे अभंग सादर झाले. ‘मला दादला नको गं बाई’ हे भारूड ताज्या संदर्भासह सादर झाले. ‘पुंडलिक वरदेऽ हरि विठ्ठलऽऽ’चा नादब्रह्म गजर आणि उत्तरार्धात सादर झालेल्या ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या अभंगाने आणि ‘देह देवाचे मंदिर’ या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. अभंगाची सुरुवात होताच प्रेक्षकांनी ठेका धरला. काही महिला आणि पुरुष रसिक प्रेक्षागृहातील रंगमंचांचासमोर उत्स्फूर्तपणे येत फुगडी व पावली खेळण्यात तल्लीन होत हरिनामाच्या नामस्मरणात रसिक दंग झाले. तरुणाईला अभंगांची गोडी लावण्याचा या समूहाचा प्रयत्न रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात यशस्वी ठरला आणि अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.

‘अभंग रिपोस्ट’चे विराज आचार्य, जॉय रुमडे, दुष्यंत देवरूखकर, स्वप्नील तर्फे, अजय वाव्हळ, प्रतीष म्हस्के आणि पीयूष आचार्य या सात कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी यशदा रिॲलिटीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे, संचालक संजय भिसे, सूर्यकांत जाधव, उपाध्यक्ष रोहिदास गवारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, लक्षद्वीप डेव्हलपर्सचे संचालक राहुल काटे, प्रगतीशील शेतकरी गणेश काटे, उद्योजक संभाजी मगर आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे उपस्थित होते. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी सर्वांचे स्वागत केले.

‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांनी आम्हाला प्रत्यक्ष वारीचे दर्शन घडवले. तरुणांची अभंग सादर करण्याची कला अप्रतिम आहे. तरुणांनाही अभंगाची गोडी निर्माण होईल, असा हा कार्यक्रम आहे.
- सविता चव्हाण, प्रेक्षक
-----

Marathi News Esakal
www.esakal.com