दिवाळीनिमित्त बाजारपेठ फुलली
लक्ष्मीपूजनच्या साहित्य
खरेदीसाठी बाजार बहरला
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः दिवाळीतील लक्ष्मीपूजन मंगळवारी (दि. २१) असून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी पिंपरीतील शगून चौक, साई चौक व फूल बाजार सोमवारी गजबजून गेला. पूजा साहित्याबरोबरच फुलांना मोठी मागणी असल्याने घाऊक बाजारात झेंडू फुलांचा दर किलोला ८० ते १०० रुपयांवर गेला होता.
हिंदू धर्मात दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी म्हटले की लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण येता असल्याने घरात आनंदाचे वातावरण असते. पिंपरीतील विविध भागांत पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल सजले होते. पूजनासाठी लक्ष्मीची मूर्ती, बोळकी, साळीच्या लाह्या, बत्तासे, रांगोळी, लक्ष्मीपट्टी स्टिकर आदी साहित्य खरेदीसाठी बाजार फुलला होता. लक्ष्मी पूजनासाठी व दुकानाला हार लावण्यासाठी आवश्यक असलेली झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहेत. शहरात ठिकठिकाणी झेंडूची फुले विक्रीसाठी होती. फूल बाजारातही विक्रेत्यांनी शेवंती, झेंडू आदी फुलांचे ढीग रचले होते. झेंडूसह इतर फुलांची खरेदीही होत होती. झेडूंचे तोरण आणि हार लक्ष वेधून घेत होते. यंदा पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. परिणामी, फुलांचे दर वाढले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुरुवारी झेंडूचा दर किलोला ८० ते १०० रुपयांवर गेला होता. तर शेवंतीनेही भाव खाल्ला होता.
-----------
दुकानांमध्ये सजावट आणि रोषणाई
लक्ष्मीपूजनाबरोबरच वही किंवा चोपडी पूजनालाही व्यापाऱ्यांमध्ये महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दुकानांमध्ये स्वच्छतेची कामे सुरू होती. घरांप्रमाणे दुकानांमध्येही सजावट आणि रोषणाईच्या कामाची लगबग सुरू होती.
-----------
पूजा साहित्याचे दर
लक्ष्मी - ४० रुपये
पाच फळे - ५० रुपये
नारळ - ४० रुपये
लक्ष्मी मूर्ती - १५० ते ५०० रुपये
साळीच्या लाह्या-बत्तासे पाकिट - ३० रुपये
-------------
असे आहेत फुलांचे दर रुपयांत (प्रतिकिलो)
झेंडू - ८०-१००
शेवंती १५०
ॲस्टर - २००
गुलछडी - ४५०-५००
गुलाब पाकळी- ३०० -४००
डच - १५०
----------