केरळात प्रारंभ; बंगालमध्ये काली पूजा

केरळात प्रारंभ; बंगालमध्ये काली पूजा

Published on

पिंपरी, ता. २१ ः दिवाळी साजरी न होणाऱ्या केरळमध्ये आता काही वर्षांत हळूहळू प्रारंभ झाला आहे. बंगालमध्ये लक्ष्मीपूजन कोजागरी पौर्णिमेलाच झाले आहे. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात काही प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. उत्तर प्रदेशात सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळीचा सण असतो, हे सर्व नोकरी, व्यवसायानिमित्त उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्थायिक झालेल्या विविध प्रांतातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर कळाले.
प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वाड्यावस्त्यांपासून महानगरांपर्यंत साजरा केला जाणारा हर्षोल्हासाचा सण म्हणजे दिवाळी. त्याचा प्रारंभ शुक्रवारपासून (ता. १७) अर्थात वसुबारसपासून झाला आहे. त्याचा उत्साह पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही बघायला मिळत आहे. शिवाय, विविध प्रांतातील प्रथा-परंपराही दिसत आहेत. कारण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशाच्या विविध राज्यांतील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त उद्योगनगरीत स्थायिक झाले आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रत्येक सण, उत्सव साजरा करत आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून दिवाळी सणाची माहिती अधोरेखित झाली.

‘‘पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत कालीमातेची पूजा केली जाते. अमावस्येच्या रात्री बारा वाजता पूजा करून प्रसाद दिला जातो. आनंद मेळावा भरतो. विविध खाद्यपदार्थ, वस्तू, खेळणी विक्रीची दुकाने लावलेली असतात. काही ठिकाणीच दिवाळी साजरी केली जाते. मात्र, नवरात्रीसह पंधरा दिवस दुर्गा पूजा असते.
- रुपक दास, मूळगाव जादकपूर, पश्चिम बंगाल

‘‘तेलंगण आणि आंध्रप्रदेशात दिवाळीला पाच दिवस शासकीय सुट्टी असते. त्यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करत असतो. मिठाई वाटली जाते. अनेकजण घरीच गोडधोड पदार्थ करतात.
- टी सिनाई, मियापूर, तेलंगणा

‘‘आमच्याकडे दिवाळी साजरी केली जात नाही. पण, आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आलो, तेव्हापासून दिवाळी साजरी करतो. आता आमचे बघून काहीजण केरळमध्येही दिवाळी साजरी करतात. श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजन करतात. गोड पदार्थ करतात. दिवे लावून फटाके उडवले जाते. मंदिरात जाऊन पूजा करतात.
- सजनी नायर, केरळ

‘‘दिवाळीचा सण पाच-सहा दिवस साजरा केला जातो. वाहने, कपडे, सोने, चांदी, इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करतात. घरांसह अंगणात मंदिरात दिवे लावले जातात. लोककलाकारांनी सादर केलेला भगवान श्रीराम आणि भरत भेटीचा ‘भरत मिलाप’ सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतात.
- आनंद यादव, चित्रकूट, उत्तर प्रदेश
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com