
सकाळ साथ चल लोगो
---
आई-वडिलांच्या सेवेचा संकल्प!
‘सकाळ’चा ‘साथ चल’ उपक्रम; पिंपरीत सामूहिक शपथ
पिंपरी, ता. २० ः पहाटेचा मंद वारा..मध्येच पावसाच्या हलक्या सरी..पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या टाळांचा खणखणाट...‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा हरिनामाचा जयघोष...ध्वनिक्षेपकावरून ऐकू येणारी भक्तिगीते अशा वातावरणात अनेक भाविकांची, संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पाउले पुणे-मुंबई महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाकडे वळत होती. सकाळी सहाच्या सुमारास देहू संस्थानचे पदाधिकारीही आले आणि ‘पुंडलिक वरदे...हरि विठ्ठल...श्री ज्ञानदेव, तुकाराम....पंढरीनाथ भगवान की जय...’ अशा नामघोषात शपथ घेऊन ‘आई-वडिलांच्या सेवेचा’ संकल्प सर्वांनी केला. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमाचे.
पंढरीच्या पांडुरंगाला विटेवर उभे राहायचे सांगून आई-वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाची कथा सर्वांना माहिती आहे. हाच पांडुरंग चंद्रभागा नदीच्या तटी युगानुयुगे विटेवरी उभा म्हणून विठ्ठल ठरला. त्याच विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावणाऱ्या आषाढी वारीनिमित्त वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे निघाला आहे. त्यांच्यासोबत प्रत्येकाने दोन पाउले चालून ‘आई-वडिलांच्या सेवेचा संकल्प करावा’, यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रम शुक्रवारी (ता. २०) पिंपरीत राबविण्यात आला. त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी ‘आई-वडिलांच्या सेवेची’ सामूहिक शपथ घेण्यात आली. देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सर्वांना शपथ दिली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक अध्यक्ष रमेश चौधरी, ज्येष्ठ कीर्तनकार बब्रुवाहन वाघ महाराज, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी सर्वांचे स्वागत केले. सामूहिक शपथ घेतल्यानंतर एचए कंपनी वसाहतीच्या प्रवेशद्वारापर्यंत ‘साथ चल’ दिंडी निघाली. तिथेही ‘आई-वडिलांच्या सेवेची’ शपथ सर्वांना देण्यात आली. वाघ महाराज यांनी शपथचे वाचन केले. या दिंडीमध्ये आणि शपथ ग्रहण सोहळ्यात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, ‘सकाळ’च्या ‘यिन’ उपक्रमातील स्वयंसेवक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गट, ‘सकाळ’ तनिष्का सदस्य, कामगार, नोकरदार सहभागी झाले होते. तसेच, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रथापुढील २५ क्रमांकाची वांगी (ता. माजलगाव, जि. बीड) येथील सद्गुरू नारायण बाबा संस्थानची दिंडीही ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी झाली होती.
पुण्यात रविवारी ‘साथ चल’
पुणे कॅम्पातील महात्मा गांधी बसस्थानक (पुलगेट) येथे रविवारी (ता. २२) सकाळी सहा वाजता ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी त्यात सहभागी होणार आहेत. संत तुकाराम महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘आई-वडिलांच्या सेवेची’ शपथ घेण्यात येणार आहे.
अशी होती शपथ
आषाढी वारीनिमित्त, पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतांच्या साक्षीने, मी शपथ घेतो की, माझे घर माझे मंदिर आहे. त्या मंदिरातील आई-वडील माझे दैवत आहेत. त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे माणून मी त्यांचा जन्मभर सांभाळ करेन. त्यांचे सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य हे माझे प्राधान्य असेल, अशी मी ग्वाही देतो. भक्त पुंडलिकाप्रमाणे माझे वर्तन राहील, अशी सुबुद्धी मला मिळो, अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करीत आहे.
आई-वडिलांची सेवा करा ः माथूर
गेल्या सहा वर्षांपासून ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमात आम्ही सहभागी होत आहोत. प्रत्येक वर्षी या उपक्रमांतर्गत वेगवेगळी संकल्पना आहे. या वर्षीची संकल्पना ‘आई-वडिलांच्या सेवेची’
आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, भक्त पुंडलिक यांनी श्री पांडुरंगाला सांगितले होते की, माझ्या आई-वडिलांची सेवा होईपर्यंत विटेवरी उभा रहा. तेव्हापासून अर्थात युगानुयुगे विठ्ठल पंढरपुरात विटेवरी उभे आहेत. आज तरुणाईनेही भक्त पुंडलिकासारखे वर्तन ठेवून सदैव आई-वडिलांची सेवा करायला हवी. त्यातच परमेश्वर आहे. कारण, आई-वडीलच सर्वात मोठे भगवान आहेत. आम्ही अनेक वृद्धाश्रमात जातो, त्यावेळी कळते की, अनेक वृद्धांना त्यांच्या मुलांनी सोडून दिले आहे. ते वृद्ध आई-वडील आपल्या मुलांच्या आठवणीत दिवस काढत असतात. त्यामुळे सर्व युवकांना विनंती आहे की, ‘सकाळ’चा आई-वडिलांच्या सेवेचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन तरुणांनी केवळ मातृ किंवा पितृ दिनालाच नव्हे तर सदैव आई-वडिलांची सेवा करावी. ‘सकाळ’ने आम्हालाही ‘आई-वडिलांची सेवा’ करण्याच्या उपक्रमात सहभागी करून घेतले, त्याबद्दल आम्ही ‘सकाळ’चे खूप आभारी आहोत, असे मत फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर यांनी व्यक्त केले.
ईश्वराचे रुप म्हणजे आई-वडील ः पुरुषोत्तम महाराज मोरे
‘आई-वडिलांचा सांभाळ’ हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. भक्त पुंडलिक हे त्याचे सर्वोत्तम असलेले सर्वश्रुत उदाहरण आहे. आई-वडिलांच्या सेवेसाठी साक्षात पांडुरंगालाच त्यांनी विटेवरी उभे केले आहे. युगानुयुगे होऊन गेली तरी हा संदेश द्यावा लागत आहे. कारण, मनुष्य प्रगत होईल, असे म्हटले जायचे. त्याची प्रगती झाली आहे. पण, काही जण आई-वडिलांची सेवा विसरले आहेत. त्यांना संतांच्या शब्दांत उपदेश करण्याची गरज आहे. त्यासाठीच ‘सकाळ’ने सुरू केलेला ‘साथ चल’ उपक्रम युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे. आई-वडिलांचा सांभाळ करण्यास प्रेरणा देणारा उपक्रम आहे. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्यांसह सर्व युवा पिढीसाठी चांगला व सकारात्मक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. ‘आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे’, या वृत्तीतून तरुणांनी वागायला हवे. कारण, आई-वडिलांची सेवा, हेच खरे सत्य आहे. त्यातच खरा आनंद आहे. ‘आई-वडील हेच आपले दैवत आहेत’, हा संदेश युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून सर्वांनी अनुकरण करावे असा आहे, अशा शब्दांत देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी मार्गदर्शन केले.
---
आई-वडील हेच देवत्व ः वाघ महाराज
तुका म्हणे डोळा। विठू बैसला सावळा। या विठुरायाला भेटण्यासाठी सर्व वैष्णवजन आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघाले आहेत. आजचा हा वारीचा आणि ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमाचा सोहळा ‘आनंदाचे डोई आनंद तरंग’ असा अवर्णनीय आहे. साधू-संतांच्या सेवेचा हा सोहळा आहे. त्यामध्ये ‘सकाळ’ने आई-वडिलांच्या सेवेचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सहभागी होऊन आई-वडिलांच्या सेवेचा संकल्प करूया. कारण, आई-वडिलांची सेवा हे खूप मोठे पुण्य कर्म आहे. ‘सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें।’ हा संतांचा संदेश घेऊन भक्त पुंडलिकाप्रमाणे आई-वडिलांची सेवा प्रत्येकाने करायला हवी. कारण, सर्व दैवत आई-वडिलांच्या ठायी आहे. संतांमुळे आपल्याला देव कळाला आहे आणि देव कळायचा असेल, तर आई-वडिलांच्या सेवेचे तत्त्व प्रत्येकाने अंगिकारायला हवे, असा संदेश ज्येष्ठ कीर्तनकार बब्रुवाहन वाघ महाराज यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.