संपत्तीच्या मोहात रक्ताच्या नात्याचाही विसर
मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ : संपत्तीसाठी कुटुंबामधील वाद इतका टोकाचा होतोय, की हसत-खेळत राहणारे एकाच घरातील सदस्य एकमेकांचे शत्रू बनत आहेत. केवळ मालमत्तेच्या वाटपावरून भावाने भावावर, मुलाने आई-वडिलांवर, भाच्याने काकावर थेट हल्ले करण्यापर्यंत काहींची मजल जात आहे. या संपत्तीच्या हव्यासात रक्ताच्या नात्यांचाही विसर पडत असून घराच्या भिंतीतील वाद आता न्यायालयाच्या दारात गेल्याचे दिसून येत आहे.
न्यायालयात पोहोचलेले कौटुंबिक वाद आणि समाजात पसरत चाललेले अस्वस्थ वातावरण ही केवळ घटनांची यादी नाही, ही माणुसकी गमावण्याची सुरूवात आहे, हे यावरून स्पष्ट होते. शहरासह परिसरातही असे अनेक प्रकार घडत असून वादाच्या घटनेप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होत आहेत. असे कटू प्रसंग टाळण्यासाठी समुपदेशन, कायदेशीर सल्ले आणि मध्यस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. तर, वाद टाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी काय केले पाहिजे, याचीही माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
अशा घटना का घडतात?
- संपत्तीचा लोभ आणि स्वार्थ
- वाटपाच्या कल्पनेने प्रेमाऐवजी हिशोब डोके वर काढतो.
- मालमत्तेचे वेळेवर वाटप न केल्यास नात्यांमध्ये संशय वाढतो.
- कोण जास्त घेईल? यासाठी कुणीच हिस्सेदार असू नये, इतका टोकाचा विचार काही स्वार्थी, हिंसक व्यक्तींकडून होतो.
* कुटुंबातील संवादाचा अभाव
- वर्षानुवर्षं मनातील राग, गैरसमज आणि वेळेवर मोकळे न केल्याने राग हिंसेत व्यक्त होतो.
- कायद्याची अर्धवट माहिती
-‘‘माझ्या वाट्याचे मला मिळत नाही’’ या समजुतीतून गैरप्रकार वाढतात.
-‘‘कायदा माझ्या बाजूने नाही’’, ‘‘माझं कोणी ऐकून घेत नाही’’ या गैरसमजातून आत्मघातकी कृती.
* बाहेरील व्यक्तींचे ‘सल्ले’
- काही वेळा एजंट्स, नातेवाईक, मित्र अशा व्यक्ती स्वार्थापोटी एकाला दुसऱ्याविरुद्ध उभे करतात.
- मानसिक अस्थैर्य व नैराश्य आणि जुने राग
- तणाव, नैराश्य, व्यसनाधीनता यामुळे व्यक्ती स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही.
- व्यसनाधीनतेमुळे त्रागा घरच्या लोकांवर निघतो.
*कुटुंबातील वाद टाळण्यासाठी उपाय
- लेखी दस्तावेज ठेवा
- वडीलधाऱ्या व्यक्तींनी हयातीतच वाटप स्पष्ट व कायदेशीर करावे
-मालमत्तेच्या बाबतीत पारदर्शक कायदेशीर कागदपत्रे तयार ठेवा
- कौटुंबिक चर्चा ठरवून घ्या, उघडपणे आणि वेळेत चर्चा करा
- गैरसमजांना थांबवा, नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा
- तटस्थ तृतीय व्यक्तीचा सल्ला तसेच समुपदेशक, कौटुंबिक सल्लागार वापरा.
- भावनिक बुद्धिमत्ता वाढवा
- महिलांचे /ज्येष्ठांचे हक्क स्पष्ट करा
- कोर्टात जाण्याआधी संवादाला संधी द्या
* सामाजिक उपाय
- समुपदेशकांमार्फत कुटुंब संवादी कार्यक्रम घ्या.
- ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांनी वेळोवेळी मार्गदर्शन सत्र घ्यावं.
- संपत्तीपेक्षा नाते मोठे ही संकल्पना दृढ करावी.
प्रॉपर्टीचे योग्य नियोजन, नात्यावर विश्वास, संवाद आणि समुपदेशन हेच अशा घटना टाळू शकतात. सध्या काही घरे संघर्षाची रणांगण झाली आहेत. काही ठिकाणी वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या वाटपावरून नातेवाईकांमध्ये तणाव इतका वाढतोय की, हल्ले, आत्महत्या आणि कधी-कधी तर थेट हत्या घडत आहेत. हक्कासाठी लढणे योग्य आहे, पण रागातून हिंसेकडे जाणे हे घातक आहे. यावर विचार आणि जागृती गरजेची आहे.
- वंदना मांढरे, समुपदेशक.
कुटुंबांमध्ये वाटणीपूर्वी मन मोकळे करणे, एकमेकांच्या गरजा समजून घेणे आणि कायद्याचा सल्ला घेऊन सामोपचाराने तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. वाटणीत मतभेद झालेच, तर त्याचं उत्तर हिंसा नव्हे, तर चर्चेचा मार्ग असायला हवा. हिंसाचार केल्याने मिळणारी शिक्षा, त्यातून उद्ध्वस्त होणारं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. संपत्तीचा मोह, आपले हक्क आणि नात्यांमधील समतोल यामध्ये योग्य तो तोल राखावा लागेल.
- प्रदीप सातपुते, समुपदेशक.
मागील काही काळातील घटना
९ मे २०२५ : आकुर्डीतील पंचतारानगर येथे पुतण्याने आणि सुनेने चुलत्याच्या भाडेकरूला मारहाण करून घराचा ताबा घेतला.
२३ मे २०२५ : उर्से येथे जमिनीच्या वादातून दोन दीर व दोन जावांनी महिलेला बेदम मारहाण केली.
६ जून २०२५ : चिंचवडमधील इंदिरानगर येथे घराचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
१० जून २०२५ : जमिनीच्या वादातून काळूस येथील पवळेवाडी येथे कुटुंबातील महिलेवर चाकूने वार करून दगडाने बेदम मारहाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.