मेट्रोचा ‘स्वयंचलित’ फटका
पिंपरी, ता. २५ ः इंटरनेट सर्व्हर डाऊन होण्याचा फटका मंगळवारी मेट्रो प्रवाशांना बसला. संत तुकारामनगर स्थानकावरील स्वयंचलित यंत्र प्रवासाची ऑनलाइन रक्कम स्वीकारायचे. मात्र, तिकीट मिळण्याऐवजी ‘पेमेंट अयशस्वी’ अशी सूचना येऊन ‘व्यवहाराचे पैस कामकाजाच्या तीन-चार दिवसात परत केले जातील,’ अशा आशयाचा संदेश यायचा. याचा अनेक प्रवाशांना फटका बसला. जवळ रोख रक्कम नसलेले नोकरदार, विद्यार्थ्यांना इतर प्रवाशांना ऑनलाइन रक्कम देऊन रोखीने तिकीट काढून प्रवास करावा लागला.
पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकात मंगळवारी (ता. २५) दुपारी दोननंतर ऑनलाइन तिकीट खरेदीची सुविधा विस्कळित झाली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. स्वयंचलित तिकीट यंत्राद्वारे पैसे स्वीकारल्यानंतरही तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवाशांना आर्थिक फटका बसला. स्थानक व्यवस्थापनाकडे त्यांनी तक्रारी केल्या. स्वयंचलित यंत्राद्वारे ऑनलाइन व्यवहार होत नसल्याने तिकीट खिडकीसमोर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तिथेही ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात नव्हते. केवळ रोख रक्कम देण्यास कर्मचारी सांगत होते. रांगेतील अनेकांकडे रोख रक्कम नसल्याने त्यांना तांत्रिक अडचणींमुळे प्रवासात अडथळे निर्माण झाले. काही प्रवाशांना इतरांकडून रोख रक्कम घेऊन तिकीट काढावे लागले, तर काहींना रोख रक्कम घेऊन आल्यावर प्रवास करावा लागला. यामुळे पुण्याकडे जाणारे विद्यार्थी, नोकरदार तसेच दैनंदिन प्रवासी अडचणीत आले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली. तिकीट यंत्राजवळ तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीही जाणवत होती. त्यामुळे अडचण नेमकी कशामुळे निर्माण झाली, यंत्रणा पूर्ववत होण्यास किती वेळ लागणार? याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम होता. मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड त्वरित दूर करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली. दरम्यान, सर्व्हर सारखे बंद, चालू होत असल्याचे उपस्थित मेट्रो कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सेकंदाचे काम; अर्धा तास थांब
माझी आज शिवाजीनगर न्यायालयात तारीख होती. मी दुपारी दोनच्या सुमारास देहू रोडहून संत तुकारामनगरपर्यंत दुचाकीने आलो. तेथून न्यायालयात मेट्रोने जाण्याचे ठरविले. दुपारी अडीच वाजता न्यायालयात सत्र सुरू होते. त्यामुळे मेट्रोने जाण्यासाठी ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी गेलो. स्वयंचलित यंत्राद्वारे तिकीट काढण्यासाठी व्हॉट्सॲपद्वारे आणि छापील दोन पर्याय असतात. मला व्हॉट्सॲपद्वारे तिकीट पर्याय आला. कारण छापील तिकीट पर्याय बंद होता. त्यामुळे व्हॉट्सॲप पर्याय निवडला. तिकिटाची रक्कम ‘गुगल पे’द्वारे दिली. मात्र, तिकीट न मिळता, ‘तुमचे पैसे दोन-तीन दिवसात परत तुमच्या खात्यात जमा होतील’, असा मेसेज मोबाईलवर आला. माझ्या मागे अनेक प्रवासी रांगेत होते. तसेच तिकीट खिडकीवरही गर्दी होती. तिकीट मास्तरकडे चौकशी केली, तर ‘सर्व्हर सकाळपासून डाऊन आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे रोख तीस रुपयांची मागणी केली. मात्र, रोख रक्कम जवळ नव्हती. न्यायालयात जाणे आवश्यक होते. एटीएमपर्यंत जाणे शक्य नव्हेत. त्यामुळे रांगेतील प्रवाशाकडून तीस रुपये घेतले. त्यांना ऑनलाइन दिले. यात माझा अर्धा तास वाया गेला. मेट्रोचा प्रवास जलद व्हावा! अशी अपेक्षा आहे. मात्र तांत्रिक अडचण लवकर सुटली पाहिजे. परतीच्या प्रवासात असाच अनुभव आला. शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्थानकातही हीच अडचण होती, अशी व्यथा आकुर्डीतील नामांकित महाविद्यालयात प्रयोगशाळा प्रमुख असलेल्या प्रवाशाने मांडली.
संत तुकारामनगर मेट्रो स्थानकात ऑनलाइन तिकीट काढताना पैसे खात्यातून गेले. मात्र, तिकीट प्राप्त झाले नाही. दोन ते तीन दिवसात पैसे परत मिळतील, असा संदेश मशिनवर आला होता.
- कालिदास दहातोंडे, प्रवासी
संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून मंडईकडे निघालो होतो. मात्र, ऑनलाइन तिकीट सुविधा बंद असल्याने अर्धा तास वाट पहावी लागली. तिकीट काउंटरवर गर्दी होती. तिथेही रोख रक्कम मागितली जात असल्याने गैरसोय झाली.
- एक प्रवासी, देहूरोड
मेट्रो स्थानकावरील स्वयंचलित तिकीट यंत्रात काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे ऑनलाइन सुविधा बंद झाल्याची तक्रार
आली होती. मात्र, थोड्या वेळात सेवा सुरळीत करण्यात आली.
-चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

