पिंपरी सामाजिक उत्तरदायित्व वडके
लेख वाचला आहे.
------
पिंपरी वर्धापन दिन
--
शहराप्रती आपले उत्तरदायित्व
आपल्या पिंपरी चिंचवड शहराला ‘आदर्श’ बनविण्यासाठी येथे राहणाऱ्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने आपले सामाजिक दायित्व निभावले पाहिजे. ‘हे शहर माझे आहे, असे मी मानतो का?’ याचा विचार केला पाहिजे. आपल्या कौटुंबिक जीवनाबरोबरच येथील सामाजिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी सामाजिक सहकार्य आणि समरसतेची आवश्यकता आहे. स्वतःमधील नागरी जाणिवा जागृत असल्या पाहिजेत. ‘मला काय त्याचे’, असा भाव न ठेवता नियम आणि कायद्याचा आदर करत सामाजिक आरोग्य, नैतिकता आणि शिस्त पाळली पाहिजे.
- राजन वडके, ज्येष्ठ पत्रकार
-------
कोणत्याही आदर्श शहरासाठी, तेथील सुखावह जीवनासाठी, चांगल्या नागरी, शैक्षणिक, आरोग्य, वैद्यकीय आदी सुविधांची आवश्यकता असते. मात्र, केवळ सर्व सुविधांमुळे शहर आदर्श होत नाही; तर तेथील सांस्कृतिक, सामाजिक वातावरणही तसे असावे लागते. सध्या ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नावाजले जात आहे. त्याला खऱ्या अर्थाने आदर्श बनविण्यासाठी येथील नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे ११ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिकेत रुपांतर झाले. तत्पूर्वी १९७२ मध्येच येथील निगडी, आकुर्डी आदी गावांतील सुमारे ४३ चौरस किलोमीटर परिसरासाठी राज्य सरकारने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना केली. त्यामुळे या भागांच्या विकासाला चालना मिळाली होती. या महापालिकेच्या स्थापनेला येत्या सात वर्षांनी म्हणजे २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होतील. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारे हे शहर प्रारंभीच्या काळात कामगारनगरी, औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जात होते. कालानुरूप झालेल्या विकासाने पिंपरी चिंचवड हे कला-क्रीडानगरीसह ‘मॉडर्न सिटी’ म्हणूनही प्रसिद्ध पावली. सध्या ‘स्मार्ट सिटी’ किंवा ‘मेट्रो सिटी’ अशी पिंपरी चिंचवडची नवी ओळख झाली आहे. काही गावांचे शहर आणि महानगर झालेल्या पिंपरी चिंचवडची ‘मिनी इंडिया’ ही ओळख मात्र आजही कायम आहे. श्रीमंत नगरपालिका ते ‘स्मार्ट सिटी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवडचा रोमांचकारी प्रवास आणि वाखाणण्याजोगा विकास अन्य शहरांच्या तुलनेत कौतुकास्पद आहे. यात येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी औद्योगिक क्षेत्रांचाही मोठा वाटा आहे. अत्यंत वेगाने वाढणाऱ्या या शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयांचाही उपयोग झाला. त्याची फळे आपण आज चाखतो आहोत.
विस्तार आणि जबाबदारी
नोकरी, व्यवसायासाठी देशभरातून पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांचा ओघ कायम राहिला. शहराच्या शेजारील अनेक गावांचा महापालिकेत समावेश झाला. प्रारंभीच्या काळात केवळ ८६ चौरस किलोमीटर परिसराच्या या शहराचा विस्तार आता १८१ चौरस किलोमीटर इतका झाला आहे. या शहरात असंख्य कुटुंबे सुखाने जीवन जगत आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यामुळे अनेक नागरी सुविधा, शैक्षणिक, सामाजिक समस्या, आरोग्य, पर्यावरण आदी प्रश्नांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या ‘मिनी भारतातील’ सुविधांचा फायदा घेत असलेले पिंपरी चिंचवडकर आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावतात की नाही, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारी प्रशासनाने कितीही सुविधा पुरवल्या, तरी कोणत्याही शहराची ओळख ही भौतिक सुविधांबरोबरच तेथील नागरिकांचे वर्तन, शिस्त, सामाजिक सलोखा, पर्यावरण अशा गोष्टींवर ठरते. याची जाणीव येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे. त्यामुळे ‘मी माझे सामाजिक उत्तरदायित्व पाळतो का?’, ‘निभावतो का?’ याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.
पर्यावरण संरक्षण
शहर विकासित होत असताना नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या जात असताना शहराचे पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे असते. ते राखले न गेल्यास हवा, ध्वनी आणि जल प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम तेथील माणसांनाच भोगावे लागतात. मोठे औद्योगिक क्षेत्र असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर निवासी आणि व्यापारी संकुले, टाउनशिप उभारल्या जात आहेत. वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. रसायनमिश्रित औद्योगिक सांडपाणी आणि निवासी भागातील सांडपाण्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर, ई-कचरा, कर्णकर्कश्य डीजेचा वापर अशा समस्या वाढत आहेत. हवा, ध्वनी आणि जल प्रदूषणाच्या बाबतीत आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. सामाजिक आरोग्य जपत निरोगी आणि आल्हाददायी वातावरणासाठी प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे. वृक्षारोपणाच्या बाबतीत पिंपरी चिंचवडने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. ‘पवना जलदिंडी’सारख्या प्रयत्नांना समाजातून अधिक बळ मिळाले पाहिजे. पर्यावरण रक्षण उपक्रमांत लोकांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष कृती केल्यास व्यक्तिगत आणि सामाजिकस आरोग्यवर्धनास ते उपयुक्त ठरेल. शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपले दायित्व काय? हे समजून वागले पाहिजे.
सामाजिक शिस्त
शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे कर्मचारी रोज काम करत असतात. काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीनेही काम केले जाते. तरीही काही विशिष्ट ठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. मग आपण अस्वछतेबाबत महापालिकेला दोष देतो. मात्र, आपण नागरिक म्हणून शहर स्वच्छतेचे नियम पाळतो का, हा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पण, प्रत्येकाने आपण राहात असलेला, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवला, सार्वजनिक ठिकाणी कचरा केला नाही, कचरा कुंडीतच टाकला, स्वच्छतेसाठी महापालिकेने उपलब्ध केलेल्या गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर केल्यास स्वच्छतेचा प्रश्न राहणार नाही. घरातील कचऱ्याचेही ‘ओला’ आणि ‘सुका’ असे विलगीकरण करण्याचा नियम आहे. त्याचे पालन केल्यास सुलभ होईल. ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. प्रवास करताना बसमधून किंवा गाडीतून थुंकणे, खाद्यपदार्थाची पाकिटे तसेच पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकून देणे टाळले पाहिजे. रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने लोक अशी कृत्ये करतात. आपल्या घरात आपण थुंकत नाही, हे लक्षात घेऊन ‘हे शहर आपले आहे’ याचे भान ठेवून वर्तन असले पाहिजे. त्यासाठी सामाजिक शिस्त बाळगत महापालिकेने केलेल्या ‘स्वच्छाग्रहाला’ लेकांनी प्रतिसाद दिल्यास प्रशासकीय यंत्रणेवरील भार हलका होईल. शहराची वाटचाल स्वच्छतेकडून समृद्धीकडे सुरू राहील. प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. सध्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांकडून मेट्रोला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आणि आशादायी आहे. ज्या पद्धतीने मेट्रो अल्पावधित लोकप्रिय झाली. पीएमपीएमएलने ‘बीआरटी’ मार्गातून सुरू केलेल्या बससेवेचे पिंपरी चिचवडकरांनी स्वागत केले. त्याचा वापरही चांगला होत आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बस वाहतुकीला काहीसा प्रतिसादही वाढला. पण, मेट्रो सुरू झाल्यानंतर दोन्ही सार्वजनिक सेवांची तुलना होऊ लागली. साहजिकच आरामदायी प्रवासासाठी लोक मेट्रोकडे वळले आहेत. प्रवाशांच्या सुलभ आणि आरामदायी प्रवासासाठी दोन्ही संस्थांनी परस्परपूरक सेवा पुरविल्यास प्रवाशांच्या दृष्टीने ते सुसह्य होईल. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतुकीच्या समस्या सुटण्यासही मदत होऊ शकेल. सार्वजनिक वाहतुकीबरोबर रिक्षाही प्रवासी सेवा देणारे माध्यम आहे. रिक्षा चालकांकडून लोकांना नियमानुसार, विनातक्रार सेवा मिळाल्यास ती साह्यभूत ठरू शकेल. यामध्ये पीएमपीएमएलचे कर्मचारी तसेच रिक्षाचालक यांनी प्रवाशांना सस्मित सेवा देणे हे त्यांचे उत्तरदायित्व ठरते.
सामाजिक नैतिकता
आपले सामाजिक उत्तरदायित्व काय आहे, ते जाणून नागरिकांनी पूर्तता केली पाहिजे. खासगी किंवा सार्वजनिक जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणे टाळले पाहिजे. असे का होते? याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी महापालिका आणि राज्यकर्त्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने विचार करून कार्यवाही करणे प्रत्येकाचे उत्तरदायित्व आहे. मी कोणतेही चुकीचे, नियमबाह्य काम करणार नाही, ही नैतिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून अशी सामाजिक नैतिकता जपल्यास तो इतरांसाठीही आदर्श ठरेल.
वाहनतळ, पार्किंगची सुविधा आवश्यक
पुण्याचे जुळे शहर म्हणूनही पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला जात असे. कालांतराने पिंपरी चिंचवडने सर्वच क्षेत्रांत विकास करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नागरी सुविधांच्या बाबतीत हे शहर पुण्यापेक्षा काकणभर सरस ठरल्याचे चित्र आहे. येथील प्रशस्त रस्त्यांचेही कौतुक केले जाते. मात्र, रस्ते प्रशस्त होऊनही वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगची समस्या कायम आहे. सुलभ वाहतुकीसाठी महाापलिकेने रस्ते मोठे केल्यानंतर रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची योग्य उपाययोजना केली पाहिजे. ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘अर्बन स्ट्रीट’ योनजेअंतर्गत वाहने उभी करण्याची सोय करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी वाहनतळ उभारायला हवे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था असावी. लेनची शिस्त पाळली गेली पाहिजे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन
शहराच्या बहुतांश चौकांमध्ये आता सीसीटीव्ही लावले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकावर वाहतूक पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता योग्य दंडात्मक कारवाई केली पाहिजे. वाहतुकीला शिस्त कशी लागेल, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चालकांना मार्गदर्शन केले म्हणजे वाहतुकीचे नियम पाळले जातील. महापालिकेसह वाहतूक पोलिस आणि वाहनचालकांनी आपापले दायित्व पार पाडले पाहिजे. सर्वांनी सामाजिक नियम, कायद्याचा आदर आणि पालन करत स्वतःचे वर्तन चांगले ठेवले पाहिजे. एकूणच तशी अलिखित आचारसंहिता स्वत:साठी तयार करून घेतली पाहिजे. नागरिकांनी आपली कर्तव्ये पाळण्याबरोबरच सरकारी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी योग्य पद्धतीने त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निभावणे आवश्यक आहे.
शालेय वयापासून प्रबोधन आवश्यक
संस्कारक्षम विद्यार्थी सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, हे लक्षात घेऊन शालेय शिक्षणात संस्कारक्षम उपक्रमांचा समावेश वाढला पाहिजे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. सामाजिक समरसता, सद्भाव ठेवण्यासाठी समाजभान राखले पाहिजे. सामाजिक सौदार्ह वाढविण्यासाठी हेतूपुरस्सर तसे कार्यक्रम झाले पाहिजेत. याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रबोधनापासून झाली पाहिजे. कौटुंबिक आणि सामाजिक प्रबोधनसाठी पुढे येत महापालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत पिंपरी चिंचवड शहर ‘आदर्श’ करण्याचा आपण संकल्प करूयात!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

