गुन्हे वृत्त
सिगारेटचे पैसे मागितल्याने
टपरीचालक तरुणाला मारहाण
पिंपरी ः सिगारेटचे पैसे मागितल्यावरून तीन जणांनी टपरीचालक तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच त्याच्या चेहऱ्यावर सिमेंटचा ब्लॉक मारला. सोमवारी (ता. २४ ) दुपारी भोसरीतील लांडेवाडी कमानीजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी नागेश दत्ता अनसरवाडे (वय २८, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल क्षिरसागर ऊर्फ संभ्या (३२), सचिन सहादु गाडेकर (३८, दोघे. , रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी), केतन सावंत ऊर्फ पिदया (३२, भोसरी) आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार अशा चौघांवर गुन्हा दाखल केला. यातील गाडेकरला अटक करण्यात आली. फिर्यादीचा लहान भाऊ आकाश टपरीवर बसला असताना दोन आरोपी दुचाकीवरून आले. सिगारेट घेऊन ते पैसे न देताच निघून जाऊ लागले. आकाशने पैसे मागितले असता आरोपींनी त्याला धमकावले आणि तोंडावर दांडक्याने मारहाण केली. सावंतने सिमेंटचा ब्लॉक उचलून आकाशच्या चेहऱ्यावर फेकून मारला. आकाश खाली पडल्यानंतर इतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आकाशच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या जबड्याच्या खालील डावी बाजू फ्रॅक्चर झाली आहे. तो बेशुद्ध असून खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
......
दुप्पट परताव्याच्या नावाखाली २० लाखांना गंडा
पिंपरी ः दुप्पट परताव्याच्या आमिषाने एका व्यक्तीला २० लाख ४० हजार रुपयांना फसविण्यात आले. १२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भोसरीतील समाधान हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी संतोष बाळकृष्ण तरटे (वय ४३, रा. रहाटणी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रमोद रवींद्र चिंतामणी (३५), संदीप बाळू आहेर (४५, दोघे. रा. दिघी रोड, भोसरी) आणि गोरक्ष प्रकाश मैड (३८, रा. जुनी सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद आणि संदीप यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. २० महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना गोरक्षच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे १५ लाख आणि रोख स्वरूपात तीन लाख रुपये भरायला लावले. त्यांनी गोरक्षची बनावट स्वाक्षरी असलेले दोन धनादेश फिर्यादीला दिले. कथित करारनाम्यात नमूद केल्यानुसार गुंतवलेल्या रकमेवर त्यांना दरमहा आठ टक्के दराने परतावा देण्यात आला नाही. आरोपींनी फिर्यादीचे १५ लाख ६० हजार रुपये परत केले. दुप्पट परताव्यापोटी एकूण ३६ लाख रुपये न देता फिर्यादीला २० लाख ४० हजार रुपयांची फसविण्यात आले.
..............
शस्त्र बाळगल्याने तीन तरुणांना अटक
पिंपरी ः पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवायांमध्ये बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राकेश विजय सोळंकी (२२, तापकीर नगर, दिघी) याला अटक केली. त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचे पालघन आणि तीनशे रुपयांचा कोयता जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी फिर्याद दिली. निगडीतील ट्रान्सपोर्टनगरमध्ये पोलिसांनी अदित्य शांताराम उगले (२०, कृष्णानगर, चिखली) याला अटक केली. त्याच्याकडून ४९,५०० रुपये किमतीचा देशी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण कोल्हे यांनी फिर्याद दिली. रावेत पोलिसांनी गौस अताऊला शेख (२९, देहूरोड) याला रावेतमधील म्हस्के वस्ती परिसरात भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटी मार्गावर ताब्यात घेतले. त्याने विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगलेले ५४,००० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल आशिष बोटके यांनी फिर्याद दिली आहे. दापोडी पोलिसांनी कासारवाडी कचरा केंद्राजवळ ओम भरत चामे (१९, नखाते वस्ती, रहाटणी) याला अटक केली. त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
.............
अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक
पिंपरी ः आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मंगळवारी (ता. २५) दुपारी हिंजवडीत एकाला रंगेहाथ पकडले. प्रतापसिंग मोडसिंग राठोड (२८, माण) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन उमरजकर यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राठोडला अटक करण्यात आली असून खबरदारी न घेता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची कल्पना असूनही अवैध कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याने विक्रीसाठी साठा केलेला ४५ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
--------------
अवैध मद्यविक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी ः अवैध मद्य विक्री प्रकरणी दोन तरुणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट चारच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २५) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरात ही कारवाई केली. सागर देवराम पारधी (२८, कान्हेवाडी बुद्रूक) आणि वैभव निवृत्ती राणे (२४, कामशेत) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे यांनी फिर्याद दिली. आरोपींनी तळेगाव दाभाडे येथील कुणाल वाइन शॉपीमधून ३३ हजार ३३० रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य अनधिकृतपणे आणि विनापरवाना खरेदी केले. ८० हजार रुपये किमतीची दुचाकीवरून ते मद्याची अवैध वाहतूक करताना आढळले.
------------
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी ः अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. वाकड चौक ते उत्कर्ष चौक मार्गावर गेल्या बुधवारी (ता. १९) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. व्यंकटेश मानसिंग पवार (वय ३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

