स्थलांतरित कामगारांना सामाजिक स्थैर्य कधी ?
पिंपरी, ता. २६ ः पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला बळकटी देणाऱ्या स्थलांतरित कामगारांना सामाजिक स्थैर्य लाभलेले नाही. त्यामुळे ते उद्योगनगरीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित स्थिती जगत आहेत.
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून दरवर्षी हजारो कामगार रोजगार, काम किंवा व्यवसायाच्या शोधात शहरात येतात. कारखान्यांतील उत्पादन, बांधकाम, वाहतूक आणि सेवा क्षेत्रात त्यांच्या श्रमांमुळे शहराचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. यानंतरही अनेक कामगारांना स्थिर निवास सुविधा, सामाजिक सुरक्षितता आणि नियोजनबद्ध उत्पन्नाचा अभाव भेडसावत आहे. कामाची हमी, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक संधी न मिळाल्याने त्यांना सतत स्थलांतर करावे लागते. अपुरी निवासव्यवस्था आणि आरोग्यसेवेच्या अभावामुळे त्यांचे जगणे खडतर झाले आहे. रोजगारातील असुरक्षिततेमुळे बहुतेकांना कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरूपातील काम स्वीकारावे लागते. कंत्राट संपल्यावर त्यांना कामावरून कमी केले जाते. नवीन काम मिळाले नाही तर त्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याच्या गरजा भागविणे अवघड ठरते.
भाषा आणि संस्कृतीतील फरक, स्थानिकांशी मर्यादित संवाद आणि सामाजिक एकात्मतेच्या अभावामुळे ते गटापुरतेच मर्यादित राहतात. यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अपुरे राहात असून त्यांची सामाजिक कुचंबणा होताना दिसते. वास्तविक हेच कामगार शहराच्या विकासाचा खरा कणा आहेत. त्यांच्या श्रमाशिवाय कारखाने, रस्ते, इमारती आणि दैनंदिन सेवा व्यवस्थित सुरू राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासन आणि समाजाने या कामगारांना सन्मानपूर्वक वागणूक आणि स्थिर जीवनमान देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
---------
कृतिशील कार्यक्रमाची गरज
स्थलांतरित कामगारांना सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी असंघटित कामगार विभागाकडून ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी परवडणाऱ्या निवासाची सोय, स्वच्छ पाणी आणि आरोग्यसेवा उपलब्ध करणे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सुविधा आणि शिष्यवृत्ती योजना राबविणे. रोजगारातील असुरक्षितता कमी करण्यासाठी किमान वेतन व सामाजिक सुरक्षा योजना काटेकोरपणे लागू करणे. तसेच, स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित यांच्यात सुसंवाद व सहभाग वाढीस लावणारे सामाजिक उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. स्थलांतरितांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ई-श्रम कार्ड आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्यास त्यांना आधार ठरेल, अशी माहिती कामगार क्षेत्रातील तज्ञांनी दिली.
---------
अस्थिरतेची कारणे
- कंत्राटी आणि तात्पुरत्या नोकरीमुळे रोजगारात सातत्य नाही
- नियमित वेतन, आरोग्यविमा, भविष्यनिर्वाह निधी सुविधांपासून वंचित
- परवडणारे घर, पाणी आणि आरोग्यसेवा नसल्याने दैनंदिन जीवन अस्थिर
- शिक्षण, प्रशिक्षण न मिळाल्याने चांगल्या नोकऱ्यांची संधी कमी
- समाजाने न स्वीकारल्याने मानसिक आणि सामाजिक असुरक्षितता
----------
मी कामासाठी कुटुंब गावी ठेवून इथे आलो आहे. महिन्याला पंधरा हजार पगार मिळतो, तोही वेळेत मिळत नाही. सध्या जावयाकडे लेबर कॅम्पमध्ये राहतो. एवढ्या पगारात कुटुंबाचा खर्च भागत नाही. घर घ्यायची इच्छा आहे, पण पैसेच उरत नाहीत. इथले लोक आमच्याकडून काम मात्र करून घेतात, पण व्यवस्थित बोलतही नाहीत.
- सुरेश पाल, कामगार
---------
जितके दिवस काम, तितक्याच दिवसांचा पगार. काम संपले की मालक थेट म्हणतो गावी जा. चार पैसे जमवायला कुटुंबासह इथे आलो. मी आणि माझी बायको दोघेही कामे करतो, मात्र आम्हाला हक्काचे घर घेता येईना. आम्हाला आरोग्याचीही सुविधा नाही. गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठवावे लागतात.
- चंदन साह, कामगार
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

