सावधान, जीवघेणा अपघात वाट पाहतोय!
पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २७ : मुंबई-पुणे महामार्गाने तुम्ही निगडीहून पिंपरीकडे येत असाल किंवा दापोडीहून निगडीकडे जात असाल, तर सावधान! तुमचा अपघात होऊ शकतो. एका बाजूने मेट्रोचे खांब उभारण्याचे, तर दुसऱ्या बाजूने महापालिकेकडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी खोदण्यात आले आहे. पण, त्याबाबतचे सूचनाफलक वा अडथळे (बॅरिकेड्स) उभारलेले नाहीत. त्यामुळे वाहन थेट धडकू शकते. बुधवारी (ता.२६) निगडीजवळ अशाच खड्ड्यात एका दुचाकीसह तिघे जण पडले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महामार्गावर निगडी ते दापोडीदरम्यान मेट्रो आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी ठिकठिकाणी बीआरटी मार्ग व सेवारस्ता खोदण्यात आला आहे. काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर जाणे आणि येण्याच्या (इन-आउट पंचिंग) मार्गात बदल केले आहेत. काही ठिकाणी दोन्हीही प्रकार सुरू आहेत. बहुतांश ठिकाणी सूचना फलक, मार्गदर्शक फलक वा बॅरिकेड्स लावलेलेच नाहीत. शिवाय, रहदारी असलेले दोन्ही बाजूचे सेवा रस्ते उखडलेले आहेत. खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत असून दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते, इन-आउट पंचिंग ठिकाणे, जलवाहिनी टाकणे व मेट्रोचे खांब उभारणे यासाठी केलेली खोदकामे, काम झाल्यानंतर रखडलेले डांबरीकरण, त्यामुळे पसरलेली खडी, पावसामुळे पडलेले खड्डे, डांबरीकरणासाठी काही ठिकाणी ओरबडलेला सेवा रस्ता यामुळे जवळपास संपूर्ण मार्गच धोकादायक झाला आहे.
कुठे काय स्थिती?
१. निगडीहून दापोडीकडे येताना
- निगडी भक्तीशक्ती चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाजवळ खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्ता बंद. पुलावरून येऊन स्पाइन रस्त्याकडे वळावे लागते
- स्पाइन रस्त्याने अंकुश चौकाकडून निगडी भक्तीशक्ती चौकाकडे येताना निगडीकडे वळताना रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. बुधवारी दोन महिला व पुरुष दुचाकींसह याच खड्ड्यात पडले
- भक्तीशक्ती चौकातून टिळक चौकाकडे येताना श्रीकृष्ण मंदिराच्या प्रवेशद्वार परिसरात मेट्रोच्या खांबासाठी सेवा रस्ता खोदलेला आहे. त्यामुळे रहदारी बंद. कामही थांबलेले आहेत. खांबांचे काम अर्धवट. तेथील सळ्यांना गंज चढला आहे
- भक्तीशक्ती चौकातून टिळक चौकाकडे येणाऱ्या सेवा रस्त्यावर खोदकामामुळे मार्ग अरुंद. खोदकामामुळे परिसरात पाणी साचले आहे. अरुंद रस्त्यामुळे बऱ्याचदा कोंडीचे प्रसंग.
- आकुर्डी ते चिंचवड स्टेशन महावीर चौकापर्यंत मेट्रोच्या कामासाठी बीआरटी रस्ता बंद. सेवा रस्त्याने वाहतूक वळवलेली
- चिंचवड स्टेशन महावीर चौक ते अहिंसा चौकापर्यंत रस्ता बंद. एमआयडीसी कार्यालय कॉर्नरपासून पिंपरी पोलिस ठाण्यामागील रस्त्याने अहिंसा चौकात वाहतूक वळवलेली
- अहिंसा चौकापासून सेंट मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोचे कामे सुरू असल्याने बीआरटी मार्ग बंद. सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळवलेली. सेवा रस्ता अरुंद, त्यातच चौकाजवळ पेट्रोलपंप असल्याने नेहमीच कोंडी
२. दापोडीहून निगडीकडे येताना
- जलवाहिनीच्या कामासाठी फुगेवाडी ते कासारवाडी बीआरटी मार्ग बंद, प्रत्यक्षात काम सुरू नाही. मात्र, मोठ्या व्यासाचे पाइप बीआरटी मार्गात ठेवले आहेत. परिणामी, वाहतूक सेवा रस्त्याने वळवलेली
- वल्लभनगर भुयारी मार्ग ते डेअरी फार्म कॉर्नरपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू असून खोदकाम केलेले आहे. परिणामी, बीआरटी मार्ग बंद ठेवल्याने पीएमपी बस सेवा रस्त्याने
- खराळवाडी येथील आसवानी भुयारी मार्ग रस्त्याच्या कॉर्नरजवळ बीआरटी मार्गात खोदकाम. त्यामुळे बीआरटी मार्ग बंद
- खराळवाडी ते पिंपरी चौकापर्यंत (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) बीआरटी मार्गात खोदकाम केलेले आहे. मात्र, त्याचे लोखंडी बॅरिकेड्स गायब झाले आहेत. रस्त्यामध्येच पाइप ठेवलेले आहेत
- पिंपरी चौक ते मोरवाडी चौकादरम्यान (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक) बीआरटी मार्गात जलवाहिनीसाठी खोदकाम. मार्गाच्या सुरुवातीला पाइप ठेवल्याने मार्ग बंद. परिणामी, सर्व बसचे संचलन सेवा रस्त्याने. शिवाय, दोन्ही चौकांदरम्यान पीसीएमसी मेट्रो स्थानकाला जोडण्यासाठी मेट्रोकडून पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने बॅरिकेड्स लावलेले असल्याने कोंडी
- मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशन अहिंसा चौकादरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू. बीआरटी बस सेवा रस्त्याने वळवलेल्या. शिवाय, एएसएम महाविद्यालयासमोर ‘इन’ आणि ‘आउट’ ठेवल्याने वाहने समारोसमोर येऊन अपघाताची शक्यता. शिवाय, ‘इन-आउट‘ मार्गांजवळ बीआरटी मार्ग खोदलेला असून सूचनाफलक किंवा बॅरिकेड्स नाहीत. त्यामुळे अपघाताची भीती
- आकुर्डी खंडोबा माळ चौक ते टिळक चौकादरम्यान बजाज ऑटो कंपनीलगत जलवाहिन्या टाकून बीआरटी मार्ग बुजवला आहे. मात्र, सपाटीकरण व डांबरीकरण नसल्याने पीएमपी बस सेवा रस्त्याने धावतात
निगडीत आमचे ऑफिस आहे. बुलेटस्वार पडला त्या खड्ड्याजवळूनच माझे दररोज येणे-जाणे असते. खड्डा खोदून साधारण पंधरा दिवस झाले आहेत. बॅरिकेट्स किंवा सूचना फलक नव्हता. खड्डाही दिसत नव्हता. त्यामुळे मला अंदाज आला नाही. पण, खड्ड्याजवळ पोहोचल्यावर दिसले आणि ब्रेक लावला, त्यामुळे खड्ड्यात पडता पडता वाचलो.
- सूरज, महाविद्यालयीन युवक
निगडी अंकुश चौक ते भक्तीशक्ती चौकाकडे येणाऱ्या मार्गावर खड्डा खोदला आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक बंद आहे. फक्त खड्डा खोदून ठेवला आहे. काहीही काम सुरू नाही. मी दररोज याच रस्त्याने चालत येते.
- पूजा सुतार, साईनाथनगर, निगडी
मी कामानिमित्त येथून दररोज जाते. काल दोन महिला स्कूटर घेऊन मागोमाग जात होत्या. दोघींच्याही स्कूटर घसरल्याने त्या खड्ड्याजवळ पडल्या. खड्ड्याभोवती बॅरिकेड्स नव्हते.
- प्रत्यक्षदर्शी महिला
मला श्रीकृष्ण मंदिरात जायचे होते. गुगल लोकेशन लावले होते. त्यानुसार गाडी चालवत होतो. पण, लोकेशन संपले तरी मंदिराकडे जाणारा रस्ता सापडत नव्हता. त्यामुळे एक जण या खड्ड्याकडेने दुचाकी घेऊन गेला. म्हणून मीदेखील गेलो. पण, घसरून पडलो.
- अपघातग्रस्त दुचाकीस्वार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

