मध्यरात्रीच्या ‘बर्थ-डे पार्टी’मुळे उडतेय झोप

मध्यरात्रीच्या ‘बर्थ-डे पार्टी’मुळे उडतेय झोप

Published on

पिंपरी, ता. २८ : मध्यरात्रीचे बारा वाजले होते, झोपेत असतानाच फटाक्यांचा मोठा आवाज येऊ लागला. सुरुवातीला काय चालले आहे काहीच समजेना, दरवाजातून बाहेर डोकावून पाहिले असता जवळच्याच चौकात आठ ते दहा मुलांचे टोळके जमा होऊन कोणाचा तरी केक कापत होते. एकमेकांच्या तोंडावर स्प्रे मारून आरडाओरडा सुरू होता. बराचवेळ हा धिंगाणा सुरू होता, असा अनुभव देहू येथील एका नागरिकाने व्यक्त केला. दरम्यान, असे प्रकार शहरासह परिसरात विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
एखाद्याचा वाढदिवस असला की, मध्यरात्री चौकात, रस्त्यावर जमा होऊन केक कापण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आरडाओरडा करीत अशा प्रकारचे उद्योग केले जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातही ठिकठिकाणी असे प्रकार पाहायला मिळतात. मोठ्या आवाजाचे आकाशातील फटाके फोडायचे, गाणी लावायची, मोठ्या घोषणा द्यायच्या, अशा प्रकारचा धिंगाणा सुरू असतो. मात्र, यामुळे परिसरातील शांतता भंग पावते. काही वेळेला तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारांमुळे केवळ आवाजाचा त्रास होत नाही, तर अपघात किंवा इजा होण्याचा धोकादेखील निर्माण होतो. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी नागरिक यांना याचा गंभीर त्रास सहन करावा लागतो. तरी अशा घटना रोखण्यासाठी संबंधितांवर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

वादाचे प्रकार
काही वेळेला अशाप्रकारे वाढदिवस साजरा करीत असताना एखाद्याच्या तोंडाला केक लावला अथवा स्प्रे मारलेला आवडत नाही. यांसह इतर कारणांवरून काही झाल्यास वादाचे प्रकार घडतात.

‘‘सोशल मीडियावर रील टाकण्यासाठी आजची तरुणाई वाटेल ते करीत असल्याचे दिसून येते. वाढदिवस साजरे करीत असताना सामाजिक भान हरपत आहे. आपल्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होवू न देता तरुणाईने वाढदिवस तसेच सामाजिक उपक्रमांद्वारे साजरे करावे. रात्री-अपरात्री चौकामध्ये उच्छाद घालून आपण आपले सामाजिक आरोग्य धोक्यात घालत आहोत. अशाप्रकारे रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
- राहुल नेवाळे, नागरिक

‘‘हद्दीत पोलिसांची गस्त सतत सुरू असते. रस्त्यावर केक कापण्याच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे प्रकार कुठे सुरू असल्यास पोलिसांना संपर्क साधावा. अशाप्रकारे गोंधळ घालणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येते.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com