रेबीजमुक्त शहरासाठी पालिकेची खास मोहीम
पिंपरी, ता. ३ ः पिंपरी चिंचवड महापालिका आणि ‘मिशन रेबीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ३) ‘पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम’ या मोहिमेला औपचारिक प्रारंभ झाला. शहर पूर्णपणे रेबीजमुक्त करण्याचा यामागील उद्देश आहे.
निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या सहभागाबरोबरच तांत्रिक व शास्त्रीय पद्धतींचा एकत्रित उपयोग करून रेबीज नियंत्रण साध्य करण्यावर महापालिका विशेष भर देत आहे. प्रशिक्षित पथकांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येईल. ‘मिशन रेबीज’चे तज्ज्ञ आणि कर्मचारी ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून महापालिकेच्या देखरेख पथकासह काम करणार आहे, अशी माहिती खोराटे यांनी दिली.
या कार्यक्रमात लसीकरण आणि रेबीज प्रतिसाद या पथकांसाठीच्या वाहनांचेही लोकार्पण झाले. महापालिका उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त श्यामकांत पाटील, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, डॉ. यश गोयल, ‘मिशन रेबीज’ चे संचालक डॉ. मुरगून अप्पूपिल्लई, प्रवीण ओवळ, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक यावेळी उपस्थित होते.
---
विशेष हेल्पलाइन
रेबीज नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष रेबीज हेल्पलाइन (क्रमांक ८७८८०७०६६५) सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना रेबीजला कारणीभूत ठरणाऱ्या संशयास्पद प्राण्यांची माहिती त्यावर कळवता येईल. या हेल्पलाईनसाठी विशेष रेबीज प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत तत्काळ तपासणी करून आवश्यक कार्यवाही होईल.
-----

