‘कचरा कुंडिमुक्त शहर’ संकल्पनेचा कचरा
पिंपरी, ता. ७ ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही पिंपरी चिंचवडमध्ये ‘कचरा कुंडिमुक्त शहर’ संकल्पना प्रभावीपणे रुजलेली दिसत नाही. महापालिकेने कचरा कुंड्या हटविल्यानंतरही बीआरटी मार्ग, बसस्थानके, उड्डाणपुलांखालील जागा, प्रमुख चौक, उद्याने, कॉलन्यांमध्येत नव्हे तर सरकारी भूखंडांवरही कचरा टाकण्याचे प्रमाण कायम आहे. या अस्वच्छतेला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी घरगुती तसेच हॉटेलमधील कचरा नेहमी टाकला जातो. सकाळी कचरा वेळेत उचलला नाही. दुर्गंधीमुळे परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांना त्रास होतो. या परिस्थितीमुळे महापालिका करत असलेल्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी अधिक सक्षम आणि कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरात सुरवातीला घरगुती कचरा संकलनासाठी पुरेशा घंटागाड्या नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्यांवर अवलंबून राहावे लागत होते. नंतर कॉम्पॅक्टरच्या मदतीने कुंड्यांतील कचरा मोशी डेपोमध्ये नेण्याची व्यवस्था झाली. २०१३-१४ मध्ये घरोघरी दोन कचरापेट्यांचे वाटप करून ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याचे आवाहन महापालिकेने केले. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विलगीकरणाची पद्धत अंगीकारली आणि घंटागाड्यांनाच प्राधान्य दिले होते. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवत ‘कचरा कुंडिमुक्त शहर’ या संकल्पनेनुसार कुंड्या हटवून घंटागाड्या वाढविल्या. यामुळे महापालिकेने राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळवून आपली ओळख निर्माण केली. याबद्दल देशभरात प्रशंसा होत असताना, कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये वायफळ गेल्याचे चित्र आहे. पूर्वी कचरा कुंड्या ठेवल्या जायच्या त्या ठिकाणी अजूनही उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ही संकल्पना अपूर्णच राहिली आहे. अनेक ठिकाणी टाकला गेलेला कचरा दिवसभर उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
येथे कचरा नेहमी टाकला जातो
- काळेवाडी फाटा, संत मदर तेरेसा बीआरटी मार्ग, विजयनगर, ज्योतिबा उद्यान (पवारनगर), आदर्शनगर, एमएम शाळा, धनगरबाबा मंदिर, रहाटणी फाटा, बीआरटी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बीआरटी मार्ग, औंध- रावेत मार्ग (जगताप डेअरी चौक-तुकाराम उड्डाणपूल), १६ नंबर थेरगाव, लक्ष्मणनगर भुयारी मार्ग, डेअरी फार्म, पवार वस्ती, ताथवडे चौक आणि पुनावळे चौक या बीआरटी स्थानकांतील कचरा कुंड्या, काळेवाडी उड्डाणपुलाखाली, श्रीकृष्ण कॉलनीकडून बीआरटीमध्ये प्रवेशाच्या भुयारी मार्गात, डांगे चौक उड्डाणपुलाखाली, पशुसंवर्धन विभागाजवळील रस्त्याच्या कडेला, तांबे कॉर्नर-काळेवाडी मार्ग, गारमळा, राजगड, समर्थ व सज्जनगड कॉलनी, डांगे चौक-भूमकर चौकातील शासकीय भूखंडालगत, थेरगाव-चिंचवड अंतर्गत रस्ता, थेरगावमधील कुणाल सोसायटीच्या शेजारील नाला.
---
उघड्यावर कचरा टाकणे हे नियमाविरोधात आहे. हा कचरा तो हॉटेलचा असो किंवा घरगुती, संबंधितांवर कडक कारवाईची तरतूद आहे. ही कारवाई आता अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे. उघड्यावर कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्वतंत्र ॲप विकसित करत आहे. नागरिकांनी या ॲपवर कचऱ्याचा फोटो आणि ठिकाणाची माहिती अपलोड केली की त्वरित कार्यवाही सुरू केली जाईल. ही प्रणाली लवकरच विकसित करून अमलात आणण्यात येणार आहे.
- प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

