मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘रील्स’चा भडिमार
पिंपरी, ता. ५ : महापालिका निवडणूक लक्षात घेता, सर्वच इच्छुकांना मतदारांची आठवण येऊ लागली आहे. त्यामुळे प्रभागांतील विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले जात आहे. संपर्क कार्यालये थाटली आहेत. आपले काम आणि नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाद्वारे रील्सचा भडिमार आणि पत्रकबाजीही केली जात आहेत.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका काही अंशी झाल्या आहेत. आक्षेप आलेल्या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होऊन २१ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह महापालिकांच्या निवडणुका पुढील तीन-चार महिन्यांत होऊ घातल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचाही समावेश आहे. या महिन्यात त्यांची घोषणा होऊ शकते, असा राजकीय नेत्यांचा अंदाज आहे. त्यानुसार सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. फक्त निवडणुकीचे रणशिंग कधी फुंकले जाते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मात्र, आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवकांसह सर्वच इच्छुकांची लगबग सुरू आहे. केलेली कामे, आयोजित कार्यक्रम मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापरही वाढला आहे. त्यात काही सेकंदाच्या ‘रील्स’चा मार्ग अनेकांनी अवलंबला आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल
प्रभागातील समस्या निकाली काढणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे; अशा अनेक संकल्पना राबविल्या जात आहेत. त्याची जाहिरात करण्याचीही चढाओढ दिसून येत आहे. कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकांकडून विविध उपक्रम व कार्यक्रमांचे रील्स तयार करून ‘व्हायरल’ केले जात आहेत.
स्वतंत्र यंत्रणेची नियुक्ती
प्रसद्धीसाठी फ्लेक्स, कमानी आणि पत्रके यांच्यापेक्षा डिजिटल माध्यमांचा वापर अधिक प्रभावी ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आले आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे चित्रीकरण, रील्स तयार करणे आणि ते समाजमाध्यमांतवर पोस्ट करणे, त्यांचे व्हिव्हज वाढविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणांचा वापर केला जात आहे.
ड्रोनचा वाढता वापर
शहरातील मैदानांवर सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ, खेळ पैठणीचा असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच दांडिया, दिवाळी पहाट व दीपोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचीही रेलचेल दिसली. या कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर वाढलेला दिसला. नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. ड्रोनव्दारे चित्रीकरण करण्याचे मानधन अधिक घेतले जात आहे. सध्या लग्नसराई व निवडणूका यामुळे या छायाचित्रकारांचाही ‘भाव’ वाढला आहे.
पॅकेजसनुसार खर्च आकारणी
‘‘कधी कधी लोकप्रतिनिधी केवळ एखाद्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी देतात. तेव्हा तेथील कामाच्या स्वरुपानुसार पैसे आकारले जातात. वर्षभर प्रसद्धीसाठी पॅकेज ठरविले जातात. त्यामध्ये चित्रीकरणापासून समाजमाध्यमांचा समावेश असतो,’’ असे एका डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालकाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

