पिंपरी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्मारक

पिंपरी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्मारक

Published on

पिंपरीत साकारतेय ‘शाश्वत गांधी’ स्मारक

महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा प्रकल्प; महात्मा गांधी विचारांचा प्रचार व प्रसार

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः सत्य, अहिंसा, सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्य लढणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणी पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहराशीही जुडल्या आहेत. आता त्या पिंपरी चिंचवड महापालिका आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून आणखी वृद्धिंगत होणार आहेत. कारण, महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपणे, प्रचार व प्रसार करणे आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास स्मारकाद्वारे मांडला जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसह (एआय) अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जाणार असून, पुढील वर्षी दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीदिनी स्मारक सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, पर्यटकांसह सर्वांसाठी महात्मा गांधी यांचे स्मारक असावे, या उद्देशाने ते उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्हज ॲंड रूरल डेव्हलपमेंटच्या प्रमुख राजश्री बिर्ला यांनी महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्याबाबत शाश्वत गांधी ॲंड स्पेशल प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष नितीन मथुरिया म्हणाले, ‘‘बिर्ला ग्रुपचे संस्थापक घनश्यामदासजी बिर्ला आणि महात्मा गांधी एकमेकांच्या विचारांनी प्रभावित होते. त्यांच्यात पत्रव्यवहार व्हायचा. स्वातंत्र्याविषयी चर्चाही व्हायची. बिर्ला यांच्यात घरी गांधीजींचे १४४ दिवसांचे शेवटचे वास्तव्य होते. त्यांची नैतिक मूल्ये, विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बिर्ला कुटुंबाने ‘शाश्वत गांधी’ योजनेतून विविध ठिकाणी प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातीलच एक अत्याधुनिक प्रकल्प पिंपरी चिंचवडमध्ये साकारत आहे.’’

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकाची वाटचाल
- १२ डिसेंबर २०१८ ः स्मारकासाठी जागा देण्याबाबत राजश्री बिर्ला यांचे महापालिकेला पत्र
- ६ जून २०१९ ः महापालिका बांधकाम रेखांकन भुखंडातील क्षेत्र स्मारकासाठी देण्यास आयुक्तांचे स्थायी समितीला पत्र
- १९ जून २०१९ ः स्मारकाचा संपूर्ण बांधकाम खर्च व देखभाल दुरुस्तीसह जागा देण्यास स्थायी समितीकडून मंजूर
- ७ सप्टेंबर २०१९ ः जागा व स्मारकाचा ताबा महापालिकेकडे राहील, असा सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर
- डिसेंबर २०२३ ः महापालिकेकडून प्रकल्प मंजूर
- नोव्हेंबर २०२४ ः प्रकल्पाचे भूमिपूजन आणि स्मारक उभारण्यास प्रारंभ

दृष्टिक्षेरात महात्मा गांधी स्मारक
- भूखंड क्षेत्र ः ६८०६.५८ चौरस मीटर
- पत्ता ः पुणे-मुंबई महामार्गालगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ, मोरवाडी, पिंपरी
- आंतरराष्ट्रीय दर्जा ः ग्रंथालय, संशोधन केंद्र, गांधी विचार परीक्षा केंद्र, गांधी जीवन उलगडणारे चित्रप्रदर्शन, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

महात्मा गांधी म्युझियमचा प्रवास
- पहिले - २००५ ः दिल्ली
- दुसरे - २०१८ ः इंग्लंड-बर्मिंगहॅम
- तिसरे - २०२० ः ओडिशा-भुवनेश्वर
- चौथे - २०२२ ः अमेरिका- न्यू जर्सी
- पाचवे - २०२६ (उद्दिष्ट) ः पिंपरी चिंचवड

गांधीजींच्या पुणे, पिंपरी चिंचवडमधील आठवणी
- धर्मार्थ दवाखाना व अनाथ विद्यार्थीगृह पिंपरी ः महात्मा गांधी यांच्या हस्ते पाच पैकी एका इमारतीचे १९१८ मध्ये उद्‍घाटन
- अनाथ विद्यार्थीगृह पिंपरी ः महात्मा गांधी यांच्या हस्ते १९२० मध्ये स्वावलंबन राष्ट्रीय पाठशाळा असे नामकरण
- आगाखान पॅलेस, पुणे ः महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे कारावास ठिकाण, कस्तुरबा यांचे निधन
- चिंचवड ः भारत छोडो आंदोलन वेळी ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर गांधीजींना पुण्याऐवजी चिंचवड रेल्वे स्थानकात उतरवून रस्तामार्गे पुण्याला नेले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्मारक उभारले जात आहे. त्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपने प्रकल्पाला ‘शाश्वत गांधी ॲंड स्पेशल प्रोजेक्ट्स’ असे संबोधले आहे. गांधीजींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्हस् ॲंड रूरल डेव्हलपमेंटच्या प्रमुख राजश्री बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम सुरू आहे.
- नितीन मथुरिया, अध्यक्ष, शाश्वत गांधी ॲंड स्पेशल प्रोजेक्ट्स, आदित्य बिर्ला ग्रुप

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसह पर्यटकांसाठी महात्मा गांधी यांचे कार्य आणि विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी स्मारक असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गालगतची पिंपरीतील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भूखंडातील ६८०६.५८ चौरस मीटर क्षेत्र आदित्य बिर्ला ग्रुपला स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने दिला आहे. स्मारक बांधकाम व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बिर्ला ग्रुपची आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका, पिंपरी चिंचवड

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पदस्पर्श पिंपरी चिंचवडला झाला आहे. पिंपरीतील अनाथ विद्यार्थीगृह १९१६ मध्ये सुरू झाले. त्यातील पाचपैकी तिसऱ्या इमारतीचे भूमिपूजन २३ मार्च १९१८ रोजी लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाले होते. त्याच इमारतीचे उद्‍घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते १२ जून १९१८ रोजी झाले होते. तसेच, या अनाथ विद्यार्थीगृहाचे ‘स्वावलंबन राष्ट्रीय पाठशाळा’ असे नामकरण १९२० गांधीजींनीच केले होते.
- श्रीकांत चौगुले, इतिहास अभ्यासक तथा साहित्यिक, पिंपळे गुरव
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com