उद्योगनगरीतील मातीचे प्रमाण घटतेय

उद्योगनगरीतील मातीचे प्रमाण घटतेय

Published on

जागतिक मृदा दिन विशेष

पिंपरी, ता. ४ : झपाट्याने विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात शेतीक्षेत्र कमी होऊन बांधकामे वाढत आहेत. रस्तेही डांबरी आणि काँक्रीटचे होत आहेत. त्यामुळे मोकळ्या जमिनीचे आणि पर्यायाने मातीचे प्रमाण घटत आहे. लोकाभिमुख विविध प्रकल्पांसाठीही जमिनीचा वापर वाढला आहे. शिल्लक जमिनीवर वाढत्या प्रदूषणाचा परिणाम होत असून तिच्या निरोगीकरणासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत.
दरवर्षी पाच डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ साजरा केला जातो. निरोगी मातीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि माती संवर्धनासाठी शाश्वत व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. त्याचे उद्दिष्ट म्हणजे मातीची धूप आणि ऱ्हास थांबवण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, मातीचे संरक्षण करणे आणि तिची गुणवत्ता राखणे हा आहे. पिंपरी चिंचवडचा विचार करता औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा मातीच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

- शहरात माती संवर्धनाचे उपाय
कठोर नियम, सतत निरीक्षण, हरित राखीव क्षेत्र आवश्यक
बांधकामापूर्वी आणि नंतर मातीची गुणवत्ता तपासणे
प्लॅस्टिक वापर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करणे
बांधकामातील अवशेष मातीमध्ये मिसळणे थांबविणे
रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे जमिनीची धूप वाढते. ते प्रमाण कमी करणे


- वाढत्या शहरीकरणाचा प्रवास
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आकुर्डी गावांचे मिळून पिंपरी चिंचवड शहर १९७० मध्ये अस्तित्वात आले
औद्योगिक कामगारांच्या घरांसाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण १९७२ मध्ये स्थापन झाले
लगतची गावे समाविष्ट करून पिंपरी चिंचवड महापालिका १९८२ मध्ये निर्माण करून विकासाला गती मिळाली
आणखी १८ गावे समाविष्ट करून १९९७ मध्ये महापालिका क्षेत्राचा विस्तार झाला
ताथवडे गावाचा २००९ मध्ये महापालिकेत समावेश झाला, तेव्हापासून शहराचे क्षेत्र १८१ चौरस किलोमीटर आहे

जमीन वापराचे प्रमाण
वापर / क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)
निवासी / ९,२९८
शेती / ४
व्यावसायिक / १७४
औद्योगिक / १,४२४
शासकीय / ९८६
बाग, मैदाने / ८६४
सार्वजनिक उपयुक्तता / ३२७
वाहतूक / २,७४१
संरक्षण / ४
अविकसित / ९७१
पाणी (नदी, नाले) / ३७४
जंगल, टेकड्या / १४४

जमीन आणि राखीव क्षेत्र
पिंपरी चिंचवड महापालिकेने १९८६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यानुसार (डीपी) निवासी क्षेत्रासाठी ११.८१ टक्के, रस्ते वाहतुकीसाठी ४.९६ टक्के आणि वनक्षेत्रासाठी ३०.४५ टक्के जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com