ॲपवर कमी दर, पण मीटरवरच भर

ॲपवर कमी दर, पण मीटरवरच भर

Published on

पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड शहरात ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा (कॅब) देणारे चालक मीटरप्रमाणेच भाडे आकारत आहेत. ॲपवर दिसणाऱ्या भाड्याच्या तुलनेत प्रवाशांना सरासरी दीडपट अधिक रक्कम देण्याची वेळ येत आहे. पण, या गंभीर प्रकाराकडे ‘आरटीओ’ अर्थात प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
खासगी कंपन्यांच्या अतिरिक्त दर बदलण्याच्या धोरणामुळे चालकांचे उत्पन्न घसरत असल्याचे कारण दाखवत चालक मीटरप्रमाणेच अधिक पैसे घेण्याचा हट्ट धरत आहेत. दरम्यान, प्रवासी-वाहतूक, चालक संघटना, कंपनी आणि आरटीओ अशा तिन्ही स्तरांवर स्पष्ट धोरण नसल्याने हा प्रश्न कठीण झाला आहे. यामध्ये प्रवाशांची मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.

घटना क्रमांक १ : बुकिंग रद्द करण्याची वेळ
पुणे कॅम्प येथे जाण्यासाठी मी ॲपवरून कॅब बुक केली. ॲपवर भाडे ३७० रुपये दिसत होते. पण, चालकाने मीटरप्रमाणे मागणी केली. त्यावेळी मला २०० रुपये अधिक द्यावे लागणार होते. मी वाढीव भाडे नाकारल्याने चालकाने बुकिंग तातडीने रद्द केले. त्यानंतर सलग दोन वेळा बुकिंग केल्यावरही चालकांनी ‘मीटरप्रमाणेच भाडे’ अशी अट घातली. हे वर्तन त्रासदायक आहे.
- सुमेध खंडारे, प्रवासी

घटना क्रमांक २ : आजारी मुलीसह दुप्पट भाड्याचा धक्का
माझ्या मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी कार बुक केली. परंतु, ॲपवरील भाड्याच्या तुलनेत चालकाने दुप्पट रक्कम मागितली. परिस्थिती नाईलाजाची असल्याने वाढीव भाडे भरूनच प्रवास करावा लागला. अशा प्रकारांवर आरटीओने त्वरित कारवाई करावी. प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेत चालकांकडून केली जाणारी ही मनमानी आता त्रासदायक होत आहे.
- नीलेश शिंदे, प्रवासी

कॅब कंपन्या त्यांचे दर वेळ आणि मागणीप्रमाणे भाडे बदलतात. त्यामुळे चालकांना दिवसातून तोट्यात फेऱ्या घ्याव्या लागतात. आरटीओ व कंपन्यांनी एकसमान दर जाहीर केल्यासच प्रश्न सुटेल. संघटना आंदोलन करत असली, तरी कंपन्या आरटीओला दाद देत नसल्याने तोडगा निघत नाही.
डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा

ॲपवर भाडे दिले असताना कॅब चालकांनी मीटरप्रमाणे भाडेसक्ती करणे योग्य नाही. खासगी कंपन्यांसोबत चर्चा सुरू असून १० ते १५ दिवसांत राज्य शासन निर्णय घेणार आहे. त्यानंतर ठरलेल्या रकमेनुसारच कॅब कंपन्यांना पैसे घ्यावे लागतील.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com