‘आयटीआय’चे अभ्यासक्रम ‘कौशल्य विकासा’च्या प्रतीक्षेत

‘आयटीआय’चे अभ्यासक्रम ‘कौशल्य विकासा’च्या प्रतीक्षेत

Published on

अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. असे मनुष्यबळ तयार करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अद्ययावत अभ्यासक्रमांच्या प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या उपलब्ध प्रशिक्षण पूर्ण करुनही त्वरित रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.
पिंपरी चिंचवड परिसरातील शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) अभ्यासक्रम अनेक वर्षांपासून जुन्याच स्वरुपात सुरू आहेत. उद्योग क्षेत्राच्या मागणीनुसार या संस्थांचे अभ्यासक्रम तुलनेने अद्ययावत झालेले नाहीत. परिणामी, विद्यार्थी आधुनिक औद्योगिक गरजांनुसार आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यात मागे पडत आहेत.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक उपकरणांवर काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे. प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना नव्या कौशल्यावर आधारित मनुष्यबळाची प्रतीक्षा आहे.

योग्य समन्वयाची गरज
राज्य सरकारकडून अभ्यासक्रमात सुधारणा आणि उद्योगसंघटनांसोबत भागीदारी करून ‘ड्युअल ट्रेनिंग’ पद्धती राबवण्याचे प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी वेगाने होत नसल्याची स्थिती आहे. विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उद्योगांच्या कार्यशाळांमध्ये ‘इंटर्नशिप’ अनिवार्य करणे आणि आयटीआयमध्ये ‘स्मार्ट लॅब्स’ उभारणे आवश्यक आहे. अद्ययावत अभ्यासक्रम, आधुनिक उपकरणे आणि उद्योगांशी थेट समन्वय साधल्यास आयटीआय प्रशिक्षण पुन्हा उद्योगमानकांशी सुसंगत होऊ शकते, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

- ‘आयटीआय’च्या मर्यादा
अनेक ठिकाणी प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी यंत्रे जुनी आणि कालबाह्य
विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष कौशल्य विकसित होत नसल्याची वस्तुस्थिती
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्वरित रोजगार मिळवण्यात विद्यार्थी अयशस्वी
उद्योग क्षेत्राला नव्या कौशल्याचे कर्मचारी हवे असताना ‘आयटीआय’ उत्तीर्ण उमेदवार त्या पातळीपर्यंत पोहचण्यात अपयशी
अपुऱ्या मनुष्यबळामुळे उद्योजकांना उत्पादन मर्यादा घालण्याची वेळ


इलेक्ट्रिक वाहने आणि सोलार टेक्निशियन प्रशिक्षण सुरू करण्याची आमची तयारी आहे. नवीन वर्षापासून विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये प्रवेश देता येईल. ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली असून ते तयार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
- बसवराज विभुते, प्राचार्य, कॅम्प एज्युकेशन सोसायटी आयटीआय, निगडी

‘न्यू-एज टेक्नॉलॉजी’मध्ये कौशल्य असलेल्या उमेदवारांची कमतरता असल्याने अनेक कंपन्यांना स्वतःची प्रशिक्षण केंद्रे उघडावी लागत आहेत. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी आम्ही ऑटोमेशन, एआय, रोबोटिक्स, थ्री-डी प्रिंटिंग आणि सीएनसी ऑपरेशन या कोर्सेस सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहोत. सध्या या प्रशिक्षणाची कमतरता आहे.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, आयटीआय, पिंपरी चिंचवड महापालिका, मोरवाडी

उद्योग क्षेत्रात विकसित होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत कुशल मनुष्यबळाची स्पष्ट कमतरता आहे. ऑटोमेशन, एआयसारख्या प्रगत तंत्रज्ञानासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सक्षम उमेदवार तयार करणे काळाची गरज आहे. कौशल्यपूर्ण उमेदवार अभावामुळे उत्पादनक्षमता घटते आणि बाजारातील वाढत्या मागणीप्रमाणे पुरवठा करणेही कठीण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून लक्षपूर्वक कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.
- विजय देशमुख, उद्योजक

आयटीआयमध्ये ऑटोमेशन, एआय, रोबोटिक्स, थ्री-डी प्रिंटिंग किंवा सीएनसी मशीन ऑपरेशनसारखे आधुनिक कोर्सेस शिकवले जात नाहीत. आम्ही वेल्डर, फिटर, वायरमन असे पारंपरिक कोर्स करतो. पण, उद्योगांमध्ये आता या कौशल्यांची फारशी मागणी नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणच मिळत नाही, तर नोकरी कुठे आणि कशी करायची, हा आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा आहे.
- सुदर्शन राठोड, माजी विद्यार्थी

या क्षेत्रांतील मनुष्यबळाला मागणी
सध्या उत्पादन उद्योगांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, ऑटोमेशन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहनांचे देखभाल तंत्र, थ्री-डी प्रिंटिंग, सीएनसी मशीन ऑपरेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, आयटीआय स्तरावर या विषयांवरील प्रशिक्षण अत्यंत मर्यादित आहे.

- शहरातील आयटीआय आणि दरवर्षी
प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राज्य सरकार - ५००
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी (महापालिका) - ३३०
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कासारवाडी (महापालिका) - १२०
आयटीआय, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, निगडी - ६०
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, डॉन बॉस्को, चिंचवड - १२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com