शहरातील रुग्णालयांत हवे बालरोग मज्जासंस्था तज्ज्ञ
पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही प्रमुख रूग्णालयात पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट (बालरोग मज्जासंस्था तज्ज्ञ) उपलब्ध नसल्याने नवजात शिशूंपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचे निदान आणि उपचार करण्यात अडचणी येत आहेत. महापालिकेअंतर्गत आठ मुख्य रुग्णालये व २९ दवाखाने असलेल्या या वाढत्या शहरात वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता गंभीर रूप धारण करत आहे.
शहराची लोकसंख्या ३०लाखांपेक्षा अधिक असताना त्यानुसार वैद्यकीय यंत्रणा सक्षम नसल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. बालरोग मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची लक्षणे अनेकदा जन्मत: किंवा बाल्यावस्थेत दिसून येतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने याचे निदान लवकर होत नाही आणि परिणामी मुलांच्या विकासात विलंब होतो. अशा अवस्थेत पालकांची कसरत वाढते, तर उपचार उशिरा सुरू झाल्यामुळे मुलांना स्वावलंबी होण्यास अधिक वेळ लागतो.
बालरोग मज्जासंस्था तज्ज्ञ हे मुलांच्या मेंदू, मज्जारज्जू, नसा आणि स्नायूंशी संबंधित समस्यांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन करतात. जन्मापासून ते किशोरवयीन वयापर्यंतच्या मुलांमध्ये आढळणाऱ्या विविध न्यूरोलॉजिकल विकारांवर हे तज्ञ उपचार करतात.
पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टची प्रमुख कामे :
योग्य निदान : फिट्स (अपस्मार), मायग्रेन, विकास-विलंब, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी यांसारख्या विकारांचे लवकर निदान करणे.
उपचार सुरू करणे : औषधोपचार, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपेशनल थेरपीची शिफारस करून उपचार प्रक्रिया राबवणे.
दीर्घकालीन व्यवस्थापन : मुलांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि उपचार पद्धतीत गरजेनुसार बदल करणे.
पालकांना मार्गदर्शन : मुलाच्या स्थितीबाबत, भविष्यातील उपचारांबाबत सल्ला देणे आणि मानसिक आधार देणे.
इतर तज्ज्ञांशी समन्वय : न्यूरोसर्जन, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आदींसोबत मिळून काम करणे.
आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब
अपस्मार (फिट्स), तीव्र किंवा वारंवार होणारी डोकेदुखी, विकासातील विलंब, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर
स्नायूंचे आजार, झोपेचे विकार या सर्व आजारांवर वेळेवर योग्य उपचार झाले, तर मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासात फरक पडू शकतो. मात्र अशा तज्ज्ञांची अनुपलब्धता ही शहरातील आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
लक्षणे दिसून आल्यावर योग्य तज्ज्ञ न सापडल्याने आम्हाला पुण्यात किंवा मुंबईत धाव घ्यावी लागते. यात वेळ आणि खर्चही वाढतो. खासगीमध्ये अशा डॉक्टरांची फी अधिक असल्याने मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते.
-संदीप वानखडे, नागरिक.
पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट या पदासाठी अद्यापपर्यंत मंजुरी देण्यात आलेली नाही. परंतु सुपर स्पेशालिटी सेवांसाठी नव्या इमारतीची उभारणी होत आहे. त्यामध्ये हे पद प्रस्तावित आहे.
-डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
दहा ते बारा टक्के मुलांना मेंदूसंबंधी विविध आजारांसाठी बालरोग मज्जासंस्था तज्ज्ञांकडे पाठविण्यात येते. अशा तज्ज्ञांकडे उपचारासाठी मोठा खर्च असतो. त्यामुळे अशा तज्ज्ञांची शहरातील रुग्णालयांमध्ये आवश्यकता आहे.
-डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभागप्रमुख, वायसीएम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

