भाजपमध्ये नेते वाढले, कार्यकर्ते संभ्रमात!
जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे नुकताच कार्यकर्ता मेळावा झाला. यात भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी, ‘पिंपरी चिंचवड शहरात नेते जास्त झालेत, नेते हे कार्यकर्ते असावेत!’ असे सूचक विधान केले होते. अंतर्गत गटबाजीला चाप लावण्यासाठीच हे विधान होते, अशी चर्चा आहे. नेते स्वतःपुरत्या ‘लॉबिंग’मध्ये व्यग्र असल्याने कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. शहरात दोन विधानसभेचे, दोन विधानपरिषदेचे दोन असे चार आमदार भाजपचे आहेत. संघटन पातळीवर चार आमदारांची तोंडे चार दिशेला आहेत. यापूर्वी जगताप आणि लांडगे यांच्यात विभागलेल्या भाजपमध्ये नवीन गटांची भर पडली.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी पदभार घेतलेले शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही पक्षाला वेगळी दिशा देण्याऐवजी आमदारांचाच कित्ता गिरवायचे धोरण आखलेले दिसते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातले थेट वरिष्ठ नेत्यांपर्यंत न्यायला कोणी वाली आहे की नाही? असाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला दिसतो.
सुरवातीपासूनच दोन आमदारांमध्ये शहरातील पक्ष विभागला गेला होता. त्यात विधानसभा निवडणुकीवेळी काटे यांनी तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपच्या चिंचवड विधानसभेचे उमेदवार असलेल्या शंकर जगताप यांच्याविरोधात बंड केले. त्याबदल्यात काटे यांना सुरवातीला शहर कार्याध्यक्ष व नंतर शहराध्यक्षपद देण्यात आले. काटे यांची निवड झाली त्यावेळी पक्षात वेगळेपण येण्याची अपेक्षा होती. काटे यांना शहराध्यक्ष करताना काही जुने कार्यकर्ते पुढाकार घेत होते. त्यांना एकत्र करून संघटन व कार्यकर्त्यांना महत्त्व येण्याची अपेक्षा नक्कीच होती. परंतु; संघटना म्हणून महत्त्व देणाऱ्या भाजपला संघटनेचे स्वरूप न देता काटे यांनी स्वत:भोवतीच केंद्रित धोरणांना महत्त्व दिल्याचे दिसते.
निवडणुकांना प्रदेश नेते पदाधिकारी बैठकांना वारंवार येत असले तरी आपला अचूक आवाज त्यांच्यापर्यंत पोचवला जातो आहे की नाही याबद्दल कार्यकर्ते शंका व्यक्त करताना दिसतात. प्रदेश पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र भेटून आपले म्हणणे मांडण्याचा अनेकांचा प्रयत्न दिसतो.
पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना पिंपरी चिंचवडचे निवडणूक प्रमुख केले आहे. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पुणे जिल्हा पूर्व भागाचे निवडणूक प्रमुख करत महापालिका क्षेत्रापासून लांब नेले. अशावेळी लांडगे यांच्या भोसरीत यंदा जगताप लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. तेवढ्यातच विधानपरिषदेतील आमदार अमित गोरखे यांचे नाव पिंपरी चिंचवडचे निवडणूक संयोजक म्हणून जाहीर झाले, पण गोरखे यांना निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत का? की केवळ जगताप यांना शह देण्याची ही एक चाल आहे, अशीही चर्चा आहे.
गोरखे व विधानपरिषदेतील आमदार उमा खापरे पिंपरी विधानसभा मतदारसंघात लक्ष घालतात. मध्यंतरी या दोघांनी मतदारसंघातील प्रश्नांसाठी महापालिका आयुक्तांबरोबर माजी नगरसेवकांच्या दोन वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या. या गटबाजीत भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचाही सक्रिय सहभाग आहे.
नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही
विधानसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवरील नेत्यांना अक्षरशः विरोधात एकही उमदा ताकदीचा नेता ठेवायचा नाही असे धोरण आखलेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाताना अनेक ठिकाणी माजी आमदार, विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी यांचे पक्षप्रवेश करून घेण्यात आले. अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. परंतु; पक्षहित दुर्लक्षित करून स्थानिक नेते मात्र हेव्यादाव्यात अडकल्याचे चित्र आहे. महापालिकेत ‘१०० पारचा’ नारा स्थानिक नेत्यांकडून दिला जातोय खरा परंतु; नेते वाढले आणि वाढलेल्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे संघटन पातळीवरचे नियोजन गटांगळ्या खात असल्याचे चित्र आहे.
---
पक्षात गटबाजी नाही. आम्ही सर्व एका विचाराने काम करतोय व
लढतोय. शहरातील चारही आमदारांना व सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेतो. शहरातील निर्णयांबाबत प्रदेशचे वरिष्ठ नेतेही लक्ष घालतात. कोअर कमिटीसह दोन्ही बाजूंचे ऐकून निर्णय घेतला जातो. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. ज्यांना उमेदवारी हवी, त्यांचा अर्ज येणे अपेक्षित आहे. अन्यथा ऐनवेळी त्यांचा विचार होणार नाही.
- शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, भाजप,
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

