‘एसटी’ संगे आजपासून पर्यटन रंगे
अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने खास पर्यटनासाठी मंगळवारपासून (ता. ९) ‘एसटी संगे पर्यटन’ विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना राज्यासह परराज्यांतील धार्मिक, ऐतिहासिक, थंड हवेच्या आणि निसर्गरम्य ठिकाणी जाता येणार आहे. या बस स्वारगेट येथून धावणार आहेत.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच पर्यटन आवडते. कोणी देवदर्शनासाठी, कोणी निसर्गरम्य ठिकाणी, तर कोणी गडकिल्ल्यांसह ऐतिहासिक ठिकाणी जाते. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार पर्यटनस्थळांची निवड करतो. विशेषतः डिसेंबर-जानेवारी महिन्यांत हे प्रमाण वाढते. यामुळेच एसटीने खास पर्यटन विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे संकेतस्थळ आणि ‘एमएसआरटीसी’ ॲपद्वारे तिकीट आरक्षित करता येणार आहे.
ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट
एसटी महामंडळाकडून पर्यटन विशेष बससेवेसाठी ६० ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के तिकीट दर आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत मोफत प्रवास करता येईल.
दृष्टिक्षेपात पर्यटन स्थळे, तिकीट दर आणि कालावधी
ठिकाण / तारीख / तिकीट दर (५० टक्के सवलत) / कालावधी (दिवस)
उज्जैन-ओंकारेश्वर / ९ व २४ डिसेंबर / २,४४५ (१,६४५) / ४
गाणगापूर दर्शन / १२ डिसेंबर / १,२३४ (७५९) / २
दिवेआगार मुरुड, जिंजरा किल्ला / १७ डिसेंबर / ९६१ (४८३) / २
हैदराबाद (रामोजी फिल्म सिटी) / २४ डिसेंबर /१,६७९ (१,१८६) / २
आदमापूर / २७ डिसेंबर / १,१४२ (५७४) / ४
स्वारगेट आगारातून ही पर्यटन बससेवा सुरू होणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून बससंख्या वाढविण्याचे नियोजन आहे. तसेच, ग्रुप बुकिंग सुविधाही उपलब्ध आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.
- अरुण सिया, विभाग नियंत्रण, पुणे

