पिंपरी राजकीय राष्ट्रवादी

पिंपरी राजकीय राष्ट्रवादी

Published on

भाजपला भिडण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ एकत्रचे मनसुबे
महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाची अपेक्षा
पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसची पंधरा वर्ष महापालिकेत एकहाती सत्ता होती. त्यांचेच काही शिलेदार फोडून भारतीय जनता पक्षाने २०१७ च्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. ती सल आजही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला बोचत आहे. त्याचे उट्टे काढण्यासाठी राज्य व केंद्रात भाजपसोबत सत्तेत असूनही महापालिकेसाठी स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने केली आहे. हीच संधी साधत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारीही दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे मनसुबे आखत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. पण, १९९९ मध्ये पक्षात फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंधरा वर्षे महापालिकेचा कारभार पाहिला. त्यांच्यामुळेच प्रशस्त रस्ते, अनेक विकास कामे, उड्डाणपूल, नद्यांवरील पूल झाल्याचे आजही बोलले जाते. मात्र, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारख्ये शिलेदार हाताशी धरून भाजपने ‘चाल’ खेळत यशस्वी ‘शह’ दिला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत १२८ पैकी ७७ जागा जिंकून सत्ता मिळवली. अजित पवार यांच्या घोडदौडीला लगाम लागला. हीच सल आजही त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लागून आहे.
मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणांमुळे पवार यांनी समर्थकांसह भाजपसोबत घरोबा साधला. पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उदय झाला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी विभागले गेले. काही भाजपमधून बाहेर पडलेले दोन्ही राष्ट्रवादीत विभागले गेले. त्यातीलच माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्षपद आले. अजित पवार यांनी माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यावर विश्वास टाकला. मात्र, त्यांच्या द्विधामनस्थितीमुळे कधी शरद पवार तर कधी अजित पवार यांच्याकडे ते झुकले. अखेर अजित पवार यांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले. परंतु, माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद आले. तर, कामठे यांच्याबाबत अनेकांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्या.
पक्षाच्या बैठकीत कामठे यांच्या नेतृत्वावर शरद पवार यांनी विश्‍वास टाकला. आता महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे सूतोवाचही त्यांनी दिलेत. मात्र, मित्र पक्ष कॉंग्रेसमध्ये शहरस्तरीय नेतृत्वाबाबत नाराजी आहे. गटतटाचे राजकारण सुरू आहे. तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काही अंशी ठिक आहे. परंतु, भारतीय जनता पक्षाचा उधळलेला वारू थोपविण्याची क्षमता त्यांच्यात दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्थात अजित पवार यांची ‘ताकद’ मिळण्याची, ते सोबत आल्यास काहीतरी ‘उद्दिष्ट’ साध्य होण्याची अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष कामठे यांना आहे. त्याबाबत चाचपणी सुरू आहे. कारण, निवडणूक असो वा त्यानंतर अस्तित्वात येणाऱ्या महापालिका सभागृहात भाजपला भिडण्यासाठी अजित पवार यांची ताकद त्यांना हवी आहे. त्यासाठीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे मनसुबे आखले जात आहेत.

अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायची की स्थानिक आघाडी करून याबाबतचा अधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतला आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकांबाबत परिस्थिती पाहून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. निवडणूकही लढली. आता महापालिका निवडणुकांसाठी निर्णय घ्यायचा आहे. त्याची चाचपणी पिंपरी चिंचवडमध्येही सुरू आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचे डोळे अजित पवार यांच्या निर्णयाकडे लागले आहेत. त्यांच्या ‘घड्याळा’ला सोबत घेऊन ‘कमळा’च्या ‘पाकळ्या’ कमी उमलतील अशी त्यांची धारणा आहे. मात्र, अजित पवार आणि निवडणुकीची जबाबदारी असलेले माजी आमदार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे काय भूमिका घेतात, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.

महायुतीचे निर्णय गुलदस्तात

महायुतीतील घटक पक्ष भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढतील, अशी सध्या चर्चा आहे.
मात्र, भाजप व राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. शिवाय, मित्र पक्षांसह विरोधी पक्षांतील काही ‘मासे’ गळाला लावण्याच्या तयारीत भाजप आहे. सर्व तत्त्वे बाजून ठेवून ‘निवडून येण्याची क्षमता असलेला आपला’ म्हणून त्यांना उमेदवारी देण्याची चर्चाही सुरू आहे. प्रसंगी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात लढतील आणि निवडणूक झाल्यावर एकत्र येतील, अशीही चर्चा आहे. शिवसेना व रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडून किंवा मैत्रीपूर्व लढतीही होऊ शकतील. तूर्त महायुतीचे निर्णय गुलदस्तात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेतृत्व अजित पवारांच्या निर्णयाकडे अपेक्षेने पाहात आहेत, हेच सत्य.
उरले दोनच पर्याय पिंपरी चिंचवड शहरात सद्यःस्थितीत भारतीय जनता पक्ष सर्व स्तरावर ताकदवान पक्ष आहे. त्यामुळे अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. आणखी काही जण प्रवेश करण्यात इच्छुक आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्थात अजित पवार यांची ताकद आहे. त्यामुळे अनेकांसमोर भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा अजित पवार यांची साथ देणे असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. आणि ज्यांना भाजप नको आहे, त्यांना दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणे सोईचे वाटत आहे. कारण, आपली ताकद टिकवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास बळ मिळेल, असे स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे.
---

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेतृत्व महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत तयार असतील तर त्यांचे आमच्याकडून स्वागतच आहे. आमच्या स्तरावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड
---

महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे बोलणे सुरू आहे. त्यांचा होकार आल्यास एकत्रितपणे निवडणूक लढवू अन्यथा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची तयारी आम्ही केली आहे.
- तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com