गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

तरुणाला गजाने बेदम मारहाण

पिंपरी : सिगारेटच्या धुरावरून झालेल्या भांडणात तरुणाला शिवीगाळ करून गजाने बेदम मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे घडली. या प्रकरणी प्रतीक लक्ष्मण दळवी (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित महादेव नलावडे (वय १९, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, थेरगाव) याला अटक केली असून अक्षय महादेव परदेशी (वय १९, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल आहे. डांगे चौक ते भूमकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. यामध्ये फिर्यादी जखमी झाले.


गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजाजवळ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. गोपाल माणिक मोरे (वय २६, रा. नऱ्हेगाव, मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोरे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ६३ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला.

पिंपरीत मेफेड्रॉन जप्त; एकाला अटक
पिंपरी : संत तुकारामनगर येथील एचए मैदान येथे संत तुकारामनगर पोलिसांनी एका तरुणाकडून सत्तर हजार रुपये किंमतीचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला. अथर्व काशिनाथ जाधव (वय १९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा जाधव याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ७० हजार रुपये किंमतीचे मेफेड्रॉन सापडले.


पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. अनिरुद्ध संतोष टेकाळे (वय २१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिरुद्ध याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस सापडले.

Marathi News Esakal
www.esakal.com