‘युती’बाबत शिवसेनेत अंतर्गत तणाव
अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याची भूमिका शिवसेनेने घेतली असली, तरी जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. २०१७ मध्ये फक्त नऊ नगरसेवकांची ताकद आणि आज त्यातील केवळ तिघे पक्षासोबत असताना, शिवसेना २५ ते ३० जागांची मागणी ठामपणे मांडत आहे. हे भारतीय जनता पक्ष मान्य करेल का, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. या राजकीय गणितांची जुळवाजुळव होत असताना महायुतीमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. आगामी चर्चेमधून कोणाला किती जागा मिळणार, यावरच शिवसैनिकांची पुढील राजकीय दिशा अवलंबून राहणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक पूर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाने वेगाने पुढे नेल्यामुळे स्थानिक राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर सर्वच प्रभागांतील इच्छुकांची हालचाल आणखी वेगवान झाली आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनादेखील तयारीला लागली आहे. यात इच्छुकांकडून अर्ज मागवणे, अर्ज भरण्याच्या कार्यशाळा आयोजन, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सुमारे पाच हजार कल्याणकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. पण, युती करण्याबाबत महायुतीकडून अद्याप एकमत न झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि इच्छुक संभ्रमात आहेत. युती होणार की नाही?, झाली तर जागांचे समीकरण कसे असणार? आणि न झाल्यास कोणती स्वतंत्र रणनीती आखावी? या सर्वच प्रश्नांवर सध्या कोणतीही स्पष्टता नसल्याने राजकीय आडाखे बांधणे पक्ष कार्यकर्त्यांना कठीण झाले आहे. परिणामी, अनेक इच्छुकांना आपल्या लढतीचा मार्ग ठरविताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी येथे शिवसेना नेते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ‘महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र’, याबाबत त्यांनी सूचक संकेत दिले. ‘‘युतीसोबत लढण्याची आमची भूमिका स्पष्ट असली, तरी १२८ जागांवर लढण्याची तयारी सुरू आहे,’’ असे बारणे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागात संघटनात्मक तयारी वेगाने सुरू झालेली दिसते. मात्र, महायुती म्हणून एकत्र लढण्याची इच्छा असतानाच शिवसेनेची २५ ते ३० जागांची मागणी भाजपकडून मान्य होणार की नाही, याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. मागणी मान्य झाली, तर पत्ता कट होण्याची स्थानिक इच्छुकांना भीती आहे. अनेक वर्षे पक्षाशी जपलेली निष्ठा, प्रभागातील लोकसेवा आणि केलेली तयारी व्यर्थ जाण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः नवख्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक अधिक कठीण ठरण्याची चिन्हे आहेत. जर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, तर जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षनेतृत्वाला पूर्ण करावे लागणार, अशी स्पष्ट दबावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढण्यासाठी आमचा वरिष्ठांकडे आग्रह आहे. तरीदेखील, १२८ प्रभागांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याच्या दृष्टीने आमची तयारी आहे. लोकांच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रम, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया, तसेच इच्छुकांना मार्गदर्शन ही सर्व पक्षाची कामे सुरू आहेत. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, तो मान्य करूनच पुढील लढतीची दिशा निश्चित केली जाईल.
- राजेश वाबळे, महानगर प्रमुख, शिवसेना, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

