शिधापत्रिकांधारकांची ई केवायसी अद्याप अपूर्णच
पिंपरी, ता. १० : सर्व शिधापत्रिकाधारकांची केवायसी (नो युवर कस्टमर) पूर्ण करून घेण्याची सूचना देऊनही शिधापत्रिकाधारक अद्यापही त्याकडे पाठ फिरवत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही कार्यालयांतर्गत ८२ टक्केच्या पुढे केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित १८ टक्के प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
सध्या पिंपरी येथील अन्नधान्य पुरवठा व वितरण कार्यालयांतर्गत एक लाख ५५ हजार ८१४ पैकी ८५ हजार १९४ शिधापत्रिकाधारकांचे केवायसी पूर्ण झाले आहे. या कार्यालयाचे ७९ टक्के केवायसी पूर्ण झाले आहेत. तर चिंचवड कार्यालयांतर्गत एक लाख ७३ हजार ९६७ शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. त्यापैकी एक लाख सहा हजार ९१३ शिधापत्रिकाधारकांचे केवायसी पूर्ण झाले आहे. ८२ टक्के केवायसी पूर्ण झाली आहे. तर भोसरी कार्यालयांतर्गत देखील एक लाख २३ हजार ३२२ जणांचे केवायसी पूर्ण आहे. या कार्यालयांतर्गत एक लाख ७७ हजार ४९२ शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. या कार्यालयांतर्गत ८३ टक्के केवायसी पूर्ण आहे.
केंद्रासह राज्य शासनाकडून वारंवार आवाहन करूनही शिधापत्रिकाधारक केवायसी करण्याकडे पाठ फिरविताना दिसत आहे. शासनाने धान्य पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला होता. तरीही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना केवायसी करून घेण्याची सूचना दिली आहे.

