साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच ः विश्वास पाटील
पिंपरी, ता. १० ः ‘‘साहित्य निर्मितीची प्रेरणा मला शाळेतूनच मिळाली,’’ अशी कृतज्ञता ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, श्रीराम विद्या मंदिर, भोजापूर साहित्य कला संस्कृती मंडळ, लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड या सर्व संस्थांच्या वतीने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांचा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अतिशय भव्य सन्मानचिन्ह, शिवरायांच्या मावळ्याची पगडी असे सन्मानाचे स्वरूप होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात शंकर गुळवे, सुदाम भोरे, मुकुंद आवटे, डॉ. रोहिदास आल्हाट, श्रीराम विद्या मंदिरचे अध्यक्ष लालासाहेब जगदाळे, संगीता हुंबे, सुनीता भोसले, पुरुषोत्तम सदाफुले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील म्हणाले, ‘‘मला साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे मिळाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावलांजवळ येऊन थांबली. तिथूनच महाकादंबरींची मालिका निर्माण झाली. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत.’’
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम विद्या मंदिर येथील सर्व शिक्षकांनी संयोजनात परीश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. शंकर गुळवे यांनी आभार मानले.

