महापालिकेच्या शाळांमध्ये कला-क्रीडा महोत्सवाला सुरवात

महापालिकेच्या शाळांमध्ये कला-क्रीडा महोत्सवाला सुरवात

Published on

पिंपरी, ता. १० : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘कला-क्रीडा महोत्सव २०२५’ ला उत्साहात सुरवात झाली आहे. या स्पर्धांना शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. शाळास्तर, विभागस्तर आणि मनपास्तर अशा तीन टप्प्यांत राबविण्यात येणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणारा ठरत आहे. हा महोत्सव शाळास्तरावर सुरू असून विभागस्तरावर १५ ते २१ डिसेंबर आणि महापालिका स्तरावर २२ ते २४ डिसेंबर २०२५ या काळात होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागातर्फे या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. कला विभागात लोकनृत्य, समूहगीत, चित्रकला आणि रांगोळी यांसारख्या पारंपरिक ते आधुनिक कलारूपांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी मिळत आहे.
क्रीडा स्पर्धांतील धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक यांसह कबड्डी, खो-खो आणि लेझीम यांसारख्या सांघिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, शिस्त, सामूहिक भावना आणि आत्मविश्वासाची पायाभरणी होत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा महोत्सव सुरू असून विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, मुख्याध्यापक यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू झालेला कला-क्रीडा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा उपक्रम आहे. महापालिका शिक्षण विभागाने शाळांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी अनेक पावले उचलली असून हा महोत्सव त्यातील पुढची पायरी आहे.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त

महापालिका शाळांमधील विद्यार्थी आत्मविश्वासाने कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि पालकांचा विश्वास यामुळेच हा उपक्रम यशस्वी होत आहे. भविष्यातील विजेते, कलाकार आणि खेळाडू या शाळांमधूनच घडतील, याची आम्हाला खात्री आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त

Marathi News Esakal
www.esakal.com