गुन्हेगारी ठेचण्यासाठी गुंडांची धिंड

गुन्हेगारी ठेचण्यासाठी गुंडांची धिंड

Published on

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ : मारामाऱ्या, खंडणी, धमकी आणि दहशत पसरवणाऱ्यांची गुन्हेगारी वृत्ती ठेचण्यासाठी पोलिसांनी कठेार भूमिका घेतली आहे. स्वत:ला गल्लीतला ‘भाई’ किंवा ‘दादा’ म्हणवून घेणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. घटनास्थळ पाहणीनिमित्त नागरिकांसमोर त्यांची धिंड काढली जात आहे. या कथित भाईंची ही सार्वजनिक बेअब्रू त्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेवर मोठा आघात मानली जात आहे. मागील काही दिवसांत पोलिसांनी ही मोहीमच सुरू केली आहे.

अनेक गुन्ह्यांत सामील असलेल्या संशयितांना पोलिस ताब्यात घेतात. चौकशीदरम्यान घटनांची शहानिशा करण्यासाठी पोलिस पथक त्यांना घटनास्थळी घेऊन जाते. परंतु, या वेळेस हे पथक साधी पाहणी न करता, गुंडांच्या हातावर बेड्या आणि कडक सुरक्षा घेरा करून तेथील प्रमुख भागांमधून फिरवत आहे. यामुळे गुंडांचे मानसिक खच्चीकरण होते, पोलिसांची कठोर भूमिका स्पष्ट होते. अशा कारवाईमुळे नागरिकांमध्येही पोलिसांविषयी विश्वास वाढत असून सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. किरकोळ भांडणे, धमक्या, फिरक्या मारणारे संशयित युवक अशा बाबींबाबतच्या तक्रारी देण्यासाठी सामान्य न घाबरता पुढे येतात.
दरम्यान, ‘‘कायदा-सुव्यवस्था मजबूत करणे व नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसी खाक्या दाखवला जाईल,’’ असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


* मोहिमेचा थेट परिणाम
गुन्हेगारांचे मनोबल ढासळले
टोळ्या शांत झाल्या; अनधिकृत जमाव कमी
नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला
व्यापारी आणि सामान्य नागरिकांत सुरक्षेची भावना


*मागील काही दिवसांत धिंड काढलेल्या टोळ्या
जाधववस्ती येथे रावण टोळी
आकुर्डी गावठाण येथे बॉबी यादव टोळी
दुर्गानगर येथे मयूर सरोदे टोळी
काळाखडक येथे राहुल चव्हाण टोळी
चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळी

आधी आणि नंतर

काही गुन्हेगारी घटनांचे सीसीटीव्ही फुटेज अथवा मोबाइलमध्ये टिपलेले व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये गुंडांचे कृत्य दिसते. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. या गुंडांना अटक केल्यानंतर बेड्या ठोकून त्यांची घटनास्थळी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी धिंड काढली जाते. त्याचाही व्हिडिओ व्हायरल होतो. त्यावरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होतो.

एखाद्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळी न्यावे लागते. घटनेची त्यांच्याकडून माहिती घेतली जात असते. दरम्यान, गुंडांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. गुंडांची दहशत मोडण्यासाठी आम्ही शिस्तबद्ध कठोर धोरण अवलंबत आहोत.
-डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com