भोसरीत मोटार चालकाला 
मारहाण प्रकरणी दोघांना अटक

भोसरीत मोटार चालकाला मारहाण प्रकरणी दोघांना अटक

Published on

पिंपरी : भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका मोटार चालकाला मारहाण करून त्याचा मोबाईल फोन आणि मोटारीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना भोसरीतील गोडाऊन चौकाजवळ स्पाईनरोड येथे घडली.
या प्रकरणी अमर पुण्याराम सिंग भैरव (रा. त्रिवेणीनगर, निगडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य लक्ष्मण विरणक आणि उद्धव उत्तम पाटोळे (दोघेही रा. भोसरी) यांना अटक केली आहे. फिर्यादी त्यांच्या मोटारीत बसलेले असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एकजण मोटारीचा दरवाजा उघडून आत शिरला आणि मोटारीची चावी काढून घेतली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. फिर्यादीच्या डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर हाता-बुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल आणि मोटारीची चावी घेऊन पसार झाले.

अमेरिकेत पैसे पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी : अमेरिकेत तातडीने पैसे पाठविण्याच्या बहाण्याने एकाने आरटीजीएसद्वारे १५ लाख ७५ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले. आणि नंतर हे पैसे पुढे न पाठवता एक व्यक्तीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना चिखली, प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी अमित अण्णासाहेब रोहमारे (रा. चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दिपू देसाई (रा. अंधेरी, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या मुलाला अमेरिका येथे शिक्षणासाठी तत्काळ १७ हजार ५०० डॉलर (भारतीय चलनात १५ लाख ७५ हजार रुपये) आवश्यक होते. याबाबत रोहमारे यांनी आरोपीला विचारणा केली. त्यावर आरोपीने माझे ओळखीचे लोक तीन तासात तुमच्या मुलापर्यंत पैसे पाठवतील, काळजी करू नका, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेऊन रोहमारे यांनी आरटीजीएसद्वारे आरोपीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले. मात्र, ते पैसे रोहमारे यांच्या मुलाला न देता आरोपीने त्या पैशांचा अपहार करून फसवणूक केली.

गुटखा, ई-सिगारेट विक्रीप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : बेकायदा गुटखा, सुगंधी सुपारी आणि ई-सिगारेट खरेदी करून टपरीत विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई जांबे येथे करण्यात आली.धनंजय संजय अनभुले (रा. भाउनगर कॉलनी, पिंपळेगुरव) आणि रोहित नवनाथ भिडे (रा. क्रांतीनगर, पिंपळेगुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी कारवाई करून ५६ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com