मोबाईलची जीवघेणी नशा बेततेय जिवावर
मोबाईलची जीवघेणी नशा बेततेय जिवावर
वाहन चालविताना सर्रास वापर; बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ : वाहन चालवताना मोबाईलचा वाढता वापर गंभीर रूप धारण करीत आहे. मोबाईलवर बोलणे, व्हिडिओ कॉल, मेसेज टाइप करणे किंवा सोशल मीडियावरचे अपडेट पाहणे, हे प्रकार वाहनचालकाची एकाग्रता भंग करीत असून, यामुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या ‘मोबाईलच्या नशे’ने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वाहतुकीमध्ये क्षणभराचे दुर्लक्ष जिवावर बेतू शकते, मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर वाहनचालक मोबाईलवर गप्पा मारताना किंवा मेसेज टाइप करताना दिसून येतात.
वाहनाच्या वेगानुसार मोबाईलमध्ये केवळ दोन-तीन सेकंद पाहिल्यास वाहन २० ते ४० मीटरपर्यंत अनियंत्रितपणे पुढे जाते. अशा स्थितीत समोरून येणारे वाहन, रस्ता ओलांडणारे पादचारी किंवा वळणावरील अडथळे व्यवस्थित दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा थेट धडक होऊन अपघात होतात. वाहन चालविताना मोबाईलचा वापर रोखण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या वर्षभरात जानेवारी ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत १३ हजार ६६३ वाहन चालकांवर कारवाई करून दोन कोटी सहा लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अपघाताला निमंत्रण
व्हिडिओ कॉलवर बोलत वाहन चालविणारे रस्त्याला पाहायला मिळतात. हेल्मेटमध्ये ब्लूटूथ लावून संभाषण करणारे तरुणही अधिक आहेत. व्हिडिओ कॉल किंवा लाइव्ह करताना चालकाचे लक्ष रस्त्यापेक्षा मोबाइलच्या स्क्रीनवर अधिक केंद्रित होते, जे अपघाताला निमंत्रण देत आहे.
हे करा
- वाहन चालवताना मोबाईलचा कोणताही वापर टाळा
- अत्यावश्यक कॉल असल्यास वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवा
- स्वतःचे तसेच इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा
- स्वतःच्या जिवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा नाही
वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा. वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो.
अशा बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
मोबाईल बोलणाऱ्यांवर केलेली कारवाई
महिना ः कारवाई ः दंड
जानेवारी ः २०१० ः ३,०६,३०००
फेब्रुवारी ः १७८६ ः २,५७,९०००
मार्च ः २०२९ ः ३,१०,२०००
एप्रिल ः १२७३ ः १,९३,८०००
मे ः ११६४ ः १,८३,००००
जून ः १०७७ ः १,७९,४०००
जुलै ः ९०३ ः १,४३,३०००
ऑगस्ट ः ८१५ ः १,१९,७०००
सप्टेंबर ः ९८६ ः १,४२,६०००
ऑक्टोबर ः ७८६ ः १,१०,६०००
नोव्हेंबर ः ८३४ ः १,२०,९०००
एकूण ः १३,६६३ ः २०,६७,७०००

