सीसीटीव्हीवरून एसटी-मेट्रोत ‘तू-तू मैं-मैं’

सीसीटीव्हीवरून एसटी-मेट्रोत ‘तू-तू मैं-मैं’

Published on

पिंपरी, ता. १३ ः मेट्रो, एसटी आणि पीएमपी बसस्थानकांमुळे वल्लभनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची ये-जा असते. हा परिसर चोरटे, मद्यपी, तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता असल्याचे ‘सकाळ’ने अनेकदा निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार एसटीने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, दोन्ही स्थानकांच्या मध्ये असलेल्या वाहनतळावर कॅमेरे कुणी बसवावेत, यावरून एसटी आणि मेट्रो यांच्यात तू तू-मै मै सुरू आहे. त्यामुळे वाहनांसह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्याने बहुतांश भागात रात्री अंधार असतो. त्यामुळे लूटमारीचे प्रकार घडत असतात. मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवारस्त्यालगत वल्लभनगरला एसटीचे बसस्थानक आहे. बसस्थानकातून बाहेर पडण्याचा मार्ग, बसस्थानकात जाणारा संत तुकारामनगर रस्त्यावरील मार्ग आणि कासारवाडीकडे जाणारा सेवा रस्ता अशा तीन बाजूंना पीएमपीची बसस्थानके आहेत. विरुद्ध दिशेला म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या दिशेलाही पीएमपीचे बसस्थानक आहे. याशिवाय, बसस्थानकालगत मेट्रोचे संत तुकारामनगर (वल्लभनगर) स्थानक आहे. त्याच्या जिन्यावरून उतरून थेट एसटी स्थानक व पीएमपी बसस्थानकांवर जाता येते. याशिवाय, एसटीच्या वाकडेवाडी स्थानकाची जागा अपुरी पडत असल्याने विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई भागातून येणाऱ्या एसटी बस रात्री मुक्कामी वल्लभनगरला येतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची ये-जा सुरू असते. दिवसाच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असते.
प्रवासी व नातेवाइकांसाठी एसटी व मेट्रो स्थानकाच्या मधल्या परिसरात वाहनतळ उभारण्यात आले आहे. तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. याशिवाय, महामार्गाच्या सेवा रस्त्यावरही अंधार असतो. तेथे वाहनांसह प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. कारण, या भागात सुरक्षारक्षक नसतात. सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर एसटी व मेट्रो प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे


अशी आहे अवस्था
- मेट्रोला वल्लभनगर वाहनतळाची जागा एसटी प्रशासनाने दिली आहे
- सीसीटीव्ही व सुरक्षा उपाय मेट्रो प्रशासनाने करावेत असे एसटी प्रशासनचे म्हणणे
- वाहनतळाची अद्याप ताब्यात घेतली नसल्याचे मेट्रो प्रशासनाचे म्हणणे

सद्यःस्थिती
‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर वल्लभनगर आगारात नवे १९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगाराचा दर्शनी परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांसह गैरकृत्यांना आळा बसण्याची अपेक्षा आहे, पण पाठीमागे असलेल्या वाहनतळाच्या सुरक्षेचा प्रश्‍न कायम आहे.

वस्तुस्थिती

वल्लभनगर आगारातून दररोज ३२७ एसटी बस सुटतात. मुंबईहून येणाऱ्या १८३ बसगाड्यांचा यात समावेश असतो. पिंपरी चिंचवड आगाराच्याही ३० बस सुटतात. रोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. स्वारगेट स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्वच आगारांमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक वाढविण्‍याचे आदेश दिले होते. यानंतर महामंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले होते. एसटी सुरक्षा (सीसीटीव्ही) समितीने चार ऑगस्ट रोजी पाहणी करून कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्‍चित केली. त्यास तीन महिने उलटूनही एकही नवा सीसीटीव्ही बसवण्यात आला नव्हता. याबाबत ‘सकाळ’ने सात डिसेंबर रोजी ‘तीन महिन्यांनंतरही सीसीटीव्ही बसविण्याकडे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर अखेर एसटी प्रशासनाला जाग आली. आगारात नवे १९
सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या महिन्यात हे काम पूर्ण होणार शक्यता आहे.

सीसीटीव्ही कक्षेत येणारी ठिकाणे ः विश्रांतिगृह, कार्यशाळा (वर्कशॉप), बसस्थानक, फलाट, आत व बाहेर जाण्याचा मार्ग
---

आगारात नवे १९ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. बस स्थानकाचा सर्व परिसर या कक्षेत येणार आहे. पण, मागील बाजूस मेट्रोने जागा घेतली आहे. त्याठिकाणी मेट्रो प्रशासनाने सीसीटीव्ही लावावेत.
- पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर
---

एसटीची जागा मेट्रोला दिली असली तरी त्याचा पूर्ण ताबा मेट्रो प्रशासनाने घेतला नाही. सीमाभिंत उभी केल्यानंतर त्या जागेवर सुरक्षितेच्या दुष्टीने उपाययोजना करण्यात येतील.
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
---

मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांना रात्री इच्छित स्थळी न उतरवता वल्लभनगर आगाराच्या बाहेर उतरवतात. आगाराबाहेर प्रचंड अंधार असतो. तेथे मद्यपी व चोरट्यांचा वावर असतो. त्यामुळे महिलांना प्रचंड असुरक्षितता वाटते.
- एस्तेर क्रिस्तोफर, पिंपरी

Marathi News Esakal
www.esakal.com