गुन्हे वृत्त
लिफ्ट अडविल्याने तरुणाला
चार अल्पवयीन मुलांची मारहाण
पिंपरी : पिंपरीतील नेहरूनगर परिसरात लिफ्ट अडवून ठेवल्याच्या कारणावरून चार अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सचिन सिद्धराम गायकवाड (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
--------------------
पाच जणांचा तरुणावर हल्ला
पिंपरी : काळेवाडीतील ज्योतिबानगर परिसरात पाच जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सूरज गयाप्रसाद यादव (रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय यादव, अजित यादव, अजय यादव, संकेत सुपेकर, संतोष कुरवत (सर्व रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे सनी यादव याच्या नातेवाइकाच्या लग्नाला गेले नव्हते. त्या रागातून आरोपींनी हल्ला केला. अजितने फिर्यादीची मान दाबली. विजयने फिर्यादीला दाबून धरले. अजयने फिर्यादीला दांडक्याने मारहाण केली. इतरांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
-----------------
मेफेड्रॉन बाळगल्याने एकाला अटक
पिंपरी : मेफेड्रॉन हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पिंपरीतील लोहमार्गाजवळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एकाला अटक केली. निखिल राजू सरोदे (रा. इंदिरानगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १६ ग्रॅम मेफेड्रॉन, दोन मोबाईल व एक दुचाकी असा एकूण तीन लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कात्रज येथून मोसीन भाई यांच्याकडून मेफेड्रॉन आणल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
------------------
गांजा बाळगल्याने दोघांना अटक
पिंपरी : दोन वेगवेगळ्या कारवायांत पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. चिंचवडमधील अजंठानगर येथील कारवाईत शंकर सुरेश तामचीकर (रा. नेहरूनगर, पिंपरी) याला अटक झाली. त्याच्याकडून सोळा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. निगडीतील पत्राशेड येथील कारवाईत विशाल दिलीप साळवे (रा. पॉवर हाऊस, भोसरी) याला अटक झाली. त्याच्याकडून पोलिसांनी नऊ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
----------------------------------------------------

