थंडी वाढूनही शाळांच्या वेळेत बदल नाही
पिंपरी, ता. १३ ः थंडीचा कडाका वाढत असतानाही शहरातील शाळा सकाळी सात वाजताच भरत आहेत. यामुळे लहान मुलांना थंडीत कुडकुडत शाळेत जावे लागत आहे. शिक्षक संघटना आणि पालकांनी शाळांची वेळ बदलण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने मात्र अद्यापही याबाबत विचार केलेला नसल्याचे वास्तव आहे.
शहरातील काही शिक्षक संघटनांनीही ही वेळ सकाळी आठ करण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभाग वरिष्ठांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही वर्षांत नोव्हेंबरच्या मध्यानंतर शहरात अचानक काही दिवस कडाक्याची थंडी पडते. काही दिवस तर तापमान आठ अंशांच्याही खाली जाते. अशावेळी विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता थंडीत कुडकुडतच शाळेत जावे लागते. सहा-सात वर्षांचे चिमुकले या थंडीचा सामना करीत व्हॅन, स्कूल बस, पालकांबरोबर दुचाकीवरून, तर कधी पायी शाळेत वेळेवर पोहोचण्याची धडपड करतात. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यामुळे वेळ एक तास पुढे ढकलण्याची मागणी काही शिक्षक संघटना करीत आहेत.
--
शाळेची वेळ बदलण्याबाबत मागणी माझ्यापर्यंत अद्याप तरी आलेली नाही. थंडीची लाट, अतिवृष्टी किंवा उष्णतेची लाट अशी परिस्थिती असेल, तर नक्कीच वेळ बदलण्याचा किंवा प्रसंगी शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला जातो.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका
---
शिक्षक संघटनेची भूमिका
अनेक ठिकाणी शाळा सकाळी सात वाजताच भरत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना त्रास असलेल्या काही ठिकाणी शाळा आठ वाजता सुरू करण्याचा निर्णय झाला पाहिजे.
- संजय येणारे, प्राथमिक शिक्षक संघ
---
सध्या वातावरणात अति थंडी, दाट धुके आणि काही विद्यार्थ्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेता शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घ्यावा. थंडीमुळे मुले शाळेत जाण्यासाठी नको म्हणतात. त्यामुळे वेळेत बदल किंवा सुट्टी देण्यामागे संविधानाच्या कलम २१ अंतर्गत असलेला सुरक्षित जीवनाचा हक्क हा नैतिक आणि कायदेशीर आधार आहे.
- विलास पाटील, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील)
---
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांकडून पुढे आली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या अति थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी थंडीची लाट किंवा लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २० ते २५ डिसेंबरदरम्यान थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देणे किंवा शाळेच्या वेळेत तात्पुरता बदल करणे आवश्यक आहे.
- शरद लावंड, जिल्हाध्यक्ष राज्य प्राथमिक शिक्षक परिषद
---
थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी सर्दी , खोकला , डोके दुःखी ने त्रस्त आहेत. शालेय उपस्थितीवर याचा परिणाम निश्चितच झाला आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक आहे.
- मनोज मराठे, राज्य सरचिटणीस पदवीधर, राज्य प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

