पिंपरी कॉलेज कट्टा
कॉलेज कट्टा
ऑटोमेशनसाठी सामंजस्य करार
सोनाली शिंदे (एम. एम. पॉलिटेक्निक)
ऑटोमेशन प्रशिक्षण आणि कस्टमाइज्ड रोबोटिक सिस्टीममध्ये कार्यरत मॅट्रिक्स रोबोटिक्स सोबत मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकने सामंजस्य करार केला. उद्योग-शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांना प्रगत रोबोटिक्स प्रशिक्षण, इंटर्नशिप, औद्योगिक भेटी, प्रमाणन कार्यक्रम आणि आधुनिक ऑटोमेशन तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष शिक्षण संधी प्रदान करणे हा कराराचा उद्देश आहे. मेकॅट्रॉनिक्स विभागाच्या व्याख्याता रूपाली राठोड आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी गणेश म्हाळणकर; मॅट्रिक्स रोबोटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक हिंदुराव जाधव व एम. एम. पॉलिटेक्निकच्या प्राचार्या गीता जोशी आदी उपस्थित होते. मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रसाद जाधव यांनी रिअल-टाइम औद्योगिक अनुभव आणि कौशल्य-आधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. हा करार व्यावहारिक शिक्षणाला प्रोत्साहन देत, रोजगारक्षमता कौशल्ये सुधारून व नवोपक्रमाला चालना देऊन शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्यास मदत करेल. कंपनीला नवीन प्रतिभेचा लाभ घेण्यास, संशोधनात सहकार्य करण्यास आणि शैक्षणिक वाढीस हातभार लावण्यास मदत मिळेल. तांत्रिक शिक्षण मजबूत व विद्यार्थ्यांना उद्योग-सज्ज क्षमतांनी सुसज्ज करण्यासाठी एम. एम पॉलिटेक्निकच्या ध्येयातील सामंजस्य करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव यांनी व्यक्त केले.
(76267)
---
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये
‘देवडॉटकॉम’ प्रथम
वैष्णवी मुंजाळ/श्रेया लोहार (अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळावी आणि देशातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आयोजित केली जाते. चोवीस तासांची नॉन-स्टॉप हॅकेथॉन स्पर्धा ओडिशामधील वीर सुरेंद्र साय युनिव्हर्सिटी संभलपूर येथे झाली. देशभरातील हजारो अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमधील उत्कृष्ट संघ यात सहभागी झाले होते. त्यात चऱ्होली लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधील एआयडीएस अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘देवडॉटकॉम’ संघाने देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ स्पर्धेत सॉफ्टवेअर विभागाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. प्रा. गीतांजली कोडबगी यांच्या मार्गदर्शनाखालील ओंकार बिरादार, करण लांडे, साहील वडासकर, अमोल राख, कोमल गुप्ता, रौनक झा यांच्या संघाने सॉफ्टवेअर विभागातील विशिष्ट समस्या निवडून त्यावर नावीन्यपूर्ण, व्यवहार्य तांत्रिक उपाय सादर केला. त्यांच्या प्रकल्पाने समस्येचे मूळ स्वरूप, अंमलबजावणीची सुलभता आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम या निकषांवर परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्राचार्य डॉ. एफ. बी. सय्यद व विभाग प्रमुख भाग्यश्री ढाकुलकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. जैन, कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजित कौर सिधू, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
(76266)
---
‘वाचाल तर वाचाल’चा संदेश
विद्याश्री कोकणे (जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे)
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त ताथवडेतील जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील जयवंत ग्रंथालयातर्फे वाचन दिन आयोजित केला होता. ‘‘आजच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी वाचन कौशल्य महत्त्वाचे आहे. पुस्तक प्रेमी मनुष्य हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो,’’ असे मत काही वाचकांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. संतोष भोसले म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आठवड्याला कमीत कमी एक पुस्तक आणि सामाजिक घडामोडींसाठी दररोजचे वर्तमानपत्र वाचणे गरजेचे आहे.’’ उपप्राचार्य डॉ. अविनाश बडधे यांनी विविध ग्रंथालयांना भेटी देण्याचे आवाहन केले. ग्रंथालय प्रमुख
डॉ. एस. पी. गुडी यांनी संयोजन केले. कोणतीही संकल्पना सखोल समजण्यासाठी वाचन आवश्यक आहे, असे सांगितले. ग्रंथालय सहाय्यक विनोद मेंगळे, प्रथम वर्ष प्रमुख डॉ. सुनीता यादव, संकुल संचालक डॉ. सुधीर भिल्लारे यांनी सहकार्य केले.
(76268)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

