‘सकाळ’च्या सरकारनामा विशेषांकाचे प्रकाशन
पिंपरी, ता. १४ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र आहे. काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधातील घटक पक्षांत मैत्रिपूर्ण लढती काही निवडणुकांमध्ये बघायला मिळाल्या आहेत. आणखी काही निवडणुका पुढील दोन महिन्यांत होणार आहेत. प्रमुख पक्षांसह अन्य प्रादेशिक पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या रणधुमाळीचा आढावा घेणारा ‘सकाळ’चा सरकारनामा राजकीय विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाला.
‘मिनी विधानसभा’ अशी ओळख असलेल्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडल्या होत्या. यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावली, राज्यातील बदलती समीकरणे आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा कारणांचा समावेश होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानुसार नगरपंचायती, नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणची मतदान प्रक्रिया झाली आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या अशा ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २१ डिसेंबरला मतमोजणी होऊन विजेते गुलाल उधळणार आहेत. शिवाय, नजीकच्या काळात महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय स्थितीचा, राजकीय पक्षांचा आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांसह पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा आढावा घेणारा सरकारनामा राजकीय विशेषांक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला आहे. त्याचे प्रकाशन माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, बापू कातळे, कविता आल्हाट, वंदना आल्हाट, नीलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे यांच्या हस्ते रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
काय आहे अंकात
लोकशाही विकेंद्रीकरणाचा यशस्वी प्रयोग (डॉ. विवेक घोटाळे), अघोषित राजकीय क्रांती (वैशाली पवार), महायुतीचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान (दीपा कदम), ‘मिनी विधानसभे’त आघाडीची अग्निपरीक्षा (सदानंद पाटील), कोण जिंकणार मुंबई (विष्णू सोनवणे) आदी लेखांचा सरकारनामा राजकीय विशेषांकात समावेश आहे. तसेच, ‘कानोसा राज्याचा’ या सदरात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदांचा राजकीय आढावा घेतला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागांचाही आढावा अंकात असून, त्यांतील पक्षीय स्थिती, संभाव्य प्रचाराचे मुद्दे आणि प्रभागांमध्ये समाविष्ट भागांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसह अभ्यासकांना आपला मतदारसंघ, तेथील प्रश्न, नेतृत्व आणि त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी सरकारनामा विशेषांकाचा उपयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

