श्रद्धांजलीच्या बॅनरवरही ‘हसतमुख’ चेहरे
पिंपरी, ता. १५ : प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण कोणतीही सीमा ओलांडायला तयार असतात. दुर्दैवी घटना, अपघात, निधन, शोकसभा किंवा स्मृतिदिन यांसारख्या संवेदनशील प्रसंगांनाही चमकोगिरीचे स्वरूप येत आहे. श्रद्धांजली किंवा अभिवादनाचे कार्यक्रम हे मुळात शांतता, संयम आणि आदर व्यक्त करण्यासाठी असतात. मात्र, दिवंगत व्यक्तीच्या फोटोखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे शब्द लिहून बॅनरवर काही जण स्वत:चे हसतमुख चेहऱ्याचे फोटो लावताना दिसत आहेत.
पूर्वी श्रद्धांजली म्हणजे मौन पाळणे, दोन शब्द मनापासून बोलणे आणि कार्यक्रम शांततेत पार पाडणे, असा संकेत होता. आज मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापायी त्या संस्कृतीला तडा गेला आहे. या प्रकारामुळे कार्यक्रमातील गांभीर्य पूर्णपणे हरवत आहे. शोक व्यक्त करण्याऐवजी हसरे चेहरे, वेगवेगळ्या हावभावात काढीलेले फोटो आणि तत्काळ सोशल मीडियावर अपलोड करण्याची घाई, हे दृश्य भावना दुखावणारे ठरते. दिवंगत व्यक्तीप्रती आदर व्यक्त करण्याऐवजी स्वतःच्या प्रसिद्धीचा डंका पिटला जात असल्याचे दिसून येते. सतत समाजमाध्यमांवर स्वतःला दाखवण्याची गरज भासणे, ही प्रसिद्धीच्या व्यसनाची लक्षणे आहेत. प्रसिद्धीचा मोह इतका अनावर झाला आहे, की योग्य-अयोग्याचा भेदच मिटत चालला आहे. चमकोगिरीसाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता समाजात बळावत चालली आहे. श्रद्धांजली किंवा अभिवादन हे केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता त्यामागील भावना जपल्या जाणे गरजेचे आहे. प्रसिद्धीपेक्षा संवेदनशीलता, आत्मभान आणि सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असल्याचे दिसून येते.
भाषणबाजी...
अंत्यविधी, दशक्रिया विधी, शोकसभा या वेळी भाषणबाजी करण्यासाठीही जणू स्पर्धाच लागलेली असते. वेळेचा कोणताही विचार न करता कितीही वेळ भाषणबाजी सुरू असते. भाषण करणाऱ्याला तो प्रसंग काय आहे, याचेही भान राहत नाही.
प्रसिद्धीसाठी कोणत्या ठिकाणी आपले फोटो प्रसिद्ध करावेत, याचे भान असायला हवे. दुःखाच्या प्रसंगात संबंधित कुटुंबाच्या दुखत सहभागी होऊन भावनिक आधार देणे गरजेचे असते. दुःखाच्या प्रसंगात श्रद्धांजलीच्या बॅनरवर आपले हसतमुख चेहऱ्याचे फोटो प्रसिद्ध करणे योग्य नाही.
- ज्ञानेश्वर बहिरे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

