निवडणूक जाहीर होताच रणधुमाळी सुरू
पिंपरी, ता. १५ : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांना अखेर स्पष्टता मिळाली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्याची तयारी चालवली आहे. तर, सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक आता सक्रिय झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून अनेकांनी निवडणूक तयारीला सुरुवात केली होती. मात्र, तारखांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये नाराजी होती. तरीही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार, अहवाल पुस्तिका, प्रभागनिहाय कार्यक्रम आणि नागरिकांशी थेट संपर्क सुरू ठेवला होता.
दरम्यान, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर बहुतांश प्रभागांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार अनेकांनी स्वतः किंवा कुटुंबातील महिला उमेदवारांची तयारी सुरू केली, तर काहींनी सोयीचा प्रभाग न मिळाल्याने इतर प्रभागांत चाचपणी सुरू केली. मतदार यादीवरील आक्षेपांनंतर १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. आरक्षण सोडतीनंतर काही माजी नगरसेवकांनी उमेदवारीसाठी पक्षांतर करत नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, मनसे आदी पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. पक्षांतर्गत मुलाखती या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असून अंतिम निर्णय आमदार आणि पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे.
बंद केलेली कार्यालये पुन्हा खुली
गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील सामाजिक, गणेश मंडळांच्या विविध कार्यक्रमांसाठी इच्छुकांना खर्च करावा लागत होता. एका बाजूला खर्च होत असताना दुसरीकडे मात्र निवडणुकीला विलंब होत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती. काहींनी थाटलेली कार्यालयेदेखील बंद केली होती. मात्र, आता निवडणुका जाहीर होताच इच्छुकांना दिलासा मिळाला असून जनसंपर्क कार्यालये मतदारांसाठी खुली झाली आहेत.
अनेकांची तारांबळ उडणार
शाळांच्या परीक्षा, हिवाळी अधिवेशन, मतदार यादीला होणारा विलंब, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधी लागल्यास महापालिका निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जातील, असा अंदाज अनेक इच्छुक वर्तवत होते. त्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेली निवडणूक तयारी देखील थंडावली होती. मात्र, अचानक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या इच्छुकांची तारांबळ उडताना दिसत आहे.
‘भाजपाकडून इच्छुक आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष भेटत आहे. सोशल मीडिया, परिचय पत्रकामार्फत प्रभागातील घरोघरी जाऊन नागरिकांना भेटत आहे. महिलांच्या माध्यमातून वेगळा गट नागरिकांना भेटून माझे प्रभाग व्हिजन मांडत आहे.’
- सुरेश म्हेत्रे, इच्छुक उमेदवार, चिखली-प्रभाग क्रमांक एक
राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, विजेच्या समस्या, पाणी, रस्ते, आरक्षणे, मोकाट श्वान आणि डीपी रस्ता या बाबत कामांना गती देण्यासाठी नागरिकांपर्यंत सोशल मीडिया, प्रचार पत्रकामार्फत पोचत आहे. महिलांसह नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. प्रामाणिक काम, विकासावर ठाम. ‘जनहित कटिबद्धाय’ हे ब्रीद घेऊन उतरणार आहे.
- साधना नेताजी काशिद, इच्छुक उमेदवार, चिखली-प्रभाग क्रमांक एक
मी भाजपकडून इच्छुक आहे. हा मोठा प्रभाग असल्याने रचना जाहीर झाल्यापासून प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रभागातील महत्त्वाच्या नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. कामाचा अहवाल तयार करून नागरिकांना देत आहे.
- शीतल जितेंद्र यादव, इच्छुक उमेदवार, चिखली-प्रभाग क्रमांक एक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

