उपेक्षित समाजाला न्याय मिळेपर्यंत लढणार : गोरखे
पिंपरी, ता. १५ : ‘‘उपेक्षित, वंचित समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील,’’ असा निर्धार आमदार अमित गोरखे यांनी येथे व्यक्त केला.
नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध लोकहिताच्या मुद्द्यांवर प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांची तालिका सभापतीपदी पुनर्नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली असून, या अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार अशी ओळख निर्माण झाल्याचेही आमदार गोरखे यांनी सांगितले.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे आदीसह माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
‘‘प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना, ग्रामीण भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांवरील अन्यायकारक दरवाढ, रेबीज प्रतिबंधक लसीचा तुटवडा, पुणे शहरातील वाढती अंमली पदार्थांची तस्करी, पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत मोबाइल टॉवर्स, मिळकत करातील त्रुटी, मुळा-मुठा नदी पाणलोट क्षेत्राचे संरक्षण, वाहतूक व पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीतील विलंब असे अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित केले,’’ असे आमदार गोरखे म्हणाले.
‘‘अंमली पदार्थ तस्करीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान १८९ गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली. प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणासाठी १२७ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील ड्रोन सर्व्हेमुळे होणाऱ्या चुकीच्या करआकारणीची चौकशी करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच अनधिकृत मोबाइल टॉवर्स, आरोग्य केंद्रांतील लस तुटवडा, महिला सुरक्षेचे प्रश्न, कॅशलेस आरोग्य सुविधा यांसह अनेक स्थानिक प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात आले,’’ असे गोरखे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

