भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची नुरा कुस्ती ?

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची नुरा कुस्ती ?

Published on

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता महायुतीतच कशी राहील यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय हालचाली होत आहेत. शहरात महाविकास आघाडीला राजकीय जागा मिळू नयेत म्हणून सध्या भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत असल्याची प्रतिमा निर्मिती (नरेटिव्ह) सिद्ध करण्यात महायुतीला बऱ्याच अंशी यश आल्याचे दिसते. तर निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष सत्तेच्या जवळ आले तरी एकमेकांना पाठिंबा देऊन महायुतीच सत्तेत येईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची ही लढत नुरा कुस्तीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर शिवसेना महायुतीत की स्वबळावर? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.
महापालिकेत एकेकाळी सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे हे मोहरे आपल्याकडे घेऊन भाजपने २०१७ मध्ये एकहाती सत्ता आणली. शहराच्या विकासाचे शिल्पकार अशी प्रतिमा असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवडत्या शहरातील सत्ता हातून गेल्याचे शल्य कायम बोचत राहिले आहे. त्यामुळे त्यांनी यावेळी निवडणुकीपूर्वीच ‘जन संवाद’ मोहीम राबवून जनतेशी थेट संवाद साधला. तसेच प्रशासनावर पकड ठेवत आपल्या झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेचा खुबीने वापर करीत त्यांनी महापालिका व सरकार दरबारी असलेले जनतेचे प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात सोडविले. त्यामुळे मंगळवारी (ता. १६) झालेल्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १५) पुणे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनीही दोन्ही महापालिकांत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे जाहीर केले. ही लढत होत असताना दोन्ही पक्ष एकमेकांवर जिव्हारी लागेल, अशी टीका करणार नसल्याचे महायुतीतील अंतर्गत बैठकीत ठरले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर मोठ्या प्रकल्पातील भ्रष्टाचार आदि वादग्रस्त मुद्द्यांवर टीका करतील याबाबत शाश्‍वती नाही. त्यामुळे ही नुरा कुस्तीच ठरेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीची अफवा?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण ३ लाख ५३ हजार ८९२ मते मिळाली होती. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच खासदार शरद पवार यांना मानणारा मतदार या शहरात आहे. तसेच काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणाराही मतदार काही प्रमाणात आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला व पर्यायाने महाविकास आघाडीला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात राजकीय जागा (स्पेस) मिळू नये म्हणून मुद्दाम रोज कोणी तरी स्थानिक नेता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा घडवून अफवा पसरवीत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेबाबतचे चित्र गुलदस्त्यात
महायुतीतील शिवसेना पक्षाच्या २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवकांच्या केवळ नऊ जागा होत्या. त्यातील माजी नगरसेवक प्रमोद कुटे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन भोसले यांनी मंगळवारी (ता. १६) अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर; राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे महायुतीत शिवसेनेला किती जागा मिळतात यावर त्यांच्या युतीचे गणित अवलंबून आहे. त्यातच खासदार श्रीरंग बारणे यांनी योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे महायुतीत की स्वबळावर लढणार हे चित्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
---
स्थानिक नेत्यांना स्वार्थ साधण्यात रस !
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची आघाडी
करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर तसेच; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड निरिक्षक प्रकाश म्हस्के यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. तर; मंगळवारी (ता. १६) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी एकत्र लढू असा प्रस्ताव दिला. याबाबत अजित पवार यांनी अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. परंतु; शहरातील भाजप वगळता अन्य पक्षांचे स्थानिक नेते आपली उमेदवारी व विजय सुकर होण्यासाठी म्हणजेच आपला स्वार्थ साधण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविताना दिसत आहेत.
-----

Marathi News Esakal
www.esakal.com