राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरीचे शहराध्यक्ष अजित पवारांना भेटले
पिंपरी, ता. १६ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी (ता. १६) भेट घेतली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढण्याबाबतचा प्रस्ताव कामठे यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.
या भेटीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे अध्यक्ष सागर चिंचवडे, कार्याध्यक्ष संतोष कवडे उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहेत. दोन्ही पक्षांतील शहरातील पदाधिकारी याबाबत आग्रह धरत आहेत. खासदार शरद पवारांनी आशीर्वाद दिल्यास एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी यापूर्वी दिली आहे. या घडामोडीला आता वेग आल्याचे चित्र आहे.
यावेळी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यात आले. आघाडीला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना महाविकास आघाडी असल्याचे कामठे यांनी सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्णय कळविला नसला तरी ते सकारात्मक आहेत, असे कामठे यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, महापालिका निवडणूक लढताना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. त्या अधिकारांच्या आधारे शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेचे, भाजपविरोधात निवडणूक लढू शकणारे पक्ष व संघटना यांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असा आमच्या शहराचा प्रस्ताव घेऊन मी आज अजित दादांकडे आलो होतो. महानगरपालिका निवडणूक आपण एकत्र लढलो तर भ्रष्टाचारी भाजपला थांबवू शकतो, हा प्रस्ताव आम्ही दादांना दिला आहे. मला कोणाचाही निरोप नव्हता, तसेच प्रदेश स्तरावरून कोणतेही आदेश आलेले नाहीत; स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या, असेच आम्हाला सांगण्यात आले आहे. कालच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रस्ताव मांडला. अजितदादांनी यावर दहा मिनिटांत सकारात्मक प्रतिसाद दिला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

